#INDvENG : भारताला 2-1 ने विजय आवश्‍यक

कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघातही चुरस

नवी दिल्ली – आयसीसी कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणे काहीसे खडतर बनले आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 असा विजय मिळवावा लागणार आहे. असे झाल्यासच भारतीय संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित होणार आहे.

न्यूझीलंडने अंतिम फेरीमध्ये आपली जागा कायम ठेवत इंग्लंड संघ हा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला या मालिकेमध्ये 2-1 असा विजय मिळवण्याची गरज आहे. सध्या दोन्ही संघ 1-1च्या बरोबरीवर असून उर्वरित दोन कसोटी सामन्यामध्ये भारताला 1 विजय, तर एक लढत अनिर्णित ठेवावी लागेल.

परंतू दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येणार आहे. इंग्लंड संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी या मालिकेत दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.
भारत व इंग्लंड संघाच्या मालिकेतील काही निकालामुळे ऑस्ट्रेलिया संघही अंतिम सामन्यात स्थान मिळवू शकतो. ही मालिका जर आता 2-2 किंवा 1-1 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे स्थान निश्‍चित होऊ शकते.

लॉर्डसमध्ये रंगणार अंतिम लढत

आयसीसीच्या या पहिल्या कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेची अंतिम लढत इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर होणार आहे. ही लढत 18 जूनला सुरू होईल. या सामन्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींमधील उत्साहही वाढला आहे. अंतिम लढत कोणत्या संघात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.