ठाणे – ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली भागात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण होती की अनेक किलोमीटर अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा स्पष्टपणे दिसत होत्या. या आगीत एका कामगारचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.
आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास लेबर कॅम्पला लागलेल्या या आगीत अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हातावर पोट भरणाऱ्या शेकडो कामगारांना बेघर व्हाव लागले आहे. दिलासादायक बाब म्हणजे या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर आग आटोक्यात आणली असून परिसर थंड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
डोंबिवलीतील कल्याण शील रोडवर एक बहुमजली इमारतीचे काम चालू आहे. ज्यामध्ये अनेक मजूर काम करीत होते. तसेच त्यांना राहण्यासाठी याठिकाणी सुमारे 172 घर बांधण्यात आली होती. पण या आगीत अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत 170 हून अधिक घर जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे अनेक सिलिंडर्सचे स्फोटही झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्याठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तासांहून अधिक काळ परिश्रम करावे लागले. तसेच कुलींग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या लेबर कॅम्पला लागलेल्या आगीत एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या दुर्घटनेत आणखी जीवितहानी झाली आहे का? किंवा इतर कोणताही कामगार या आगीत सापडला आहे का? याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.