तैपेई – टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी चीन-तैवान आणि रशिया-युक्रेनदरम्यानचा तणाव कमी करण्यासाठी सुचवलेल्या प्रस्तावामुळे त्यांच्यावर मोठी टीका व्हायला लागली आहे. तैवानला चीनचा विशेष प्रशासकीय दर्जा देण्यात यावा, असे मस्क यांनी सुचवले होते. मात्र मस्क यांच्या या प्रस्तावामुळे केवळ राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे अवमूल्यनच होते असे नसून लोकशाहीलाही इजा पोहोचत असल्याची प्रतिक्रिया तैवानमधील डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या प्रवक्त्याने दिली आहे.
तर चीनच्या सेंट्रल टेलिव्हीजन न्यूज या सरकारी वृत्तसंस्थेने एक लेख लिहून मस्क ( Elon Musk ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “चीनच्या तैवानबाबतच्या विषयावर भाष्य करणे मस्क यांना कारणच नाही.’ असे या लेखामध्ये म्हटले आहे. तैवान हा चीनचा देशांतर्गत राजकारणाचा विषय असून या विषयामध्ये कोणत्याही विदेशी व्यक्तीने हस्तक्षेप केलेले चीन खपवून घेणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.
मस्क ( Elon Musk ) यांनी युक्रेन आणि रशियादरम्यानचे युद्ध थांबवण्यासाठीही एक प्रस्ताव सुचवला होता. त्यामुळेही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रशियाने 2014 मध्ये ताब्यात घेतलेल्या क्रिमियाला रशियाच्या ताब्यातच राहू दिले जावे, असे मस्क यांनी सुचवले होते. क्रिमिया युक्रेनला दिले जाईपर्यंत तत्कालिन सोव्हिएत रशियाचाच भाग होता. त्यामुळे युक्रेनच्या विजयासह हे युद्ध समाप्त होणार नाही, असेही मस्क म्हणाले आहेत.
एवढेच नाही तर रशियाने अलिकडेच युक्रेनच्या ज्या भूभागांमध्ये सार्वमत घेऊन ते भाग रशियाच्या मुख्य भूमीला जोडून घेतले आहेत, तेथे संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून नव्याने मतदान घेण्यात यावे. या भूभागातील नागरिकांनी युक्रेन किंवा रशिया यापैकी एक पर्याय निवडण्यासाठी मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवर एक ऑनलाइन मतदान देखील घोषित करून टाकले आहे. याशिवाय रशियाने आपले राखीव सैन्य आता युद्धभूमीत उतरवले असल्याने युक्रेनने तटस्थ भूमिका स्विकारावी.
“नाटो’मध्ये सामील होण्याचा विचार सोडून द्यावा, असा अनाहूत सल्लाही मस्क ( Elon Musk ) यांनी दिला आहे. रशियाने घेतलेले सार्वमत जागतिक पातळीवर सर्वच आंतरराष्ट्रीय संस्थांनी फेटाळून लावले आहे. मस्क यांचे हे प्रयत्न म्हणजे पूर्णपणे रशिया धार्जिणे असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ट्विटरवरील मतदानाची खिल्ली उडवताना झेलेन्सकी यांनी “तुम्ही रशियाला पाठिंबा देणार का युक्रेनला?’ अशी विचारणा करणारी मते मागवली आहेत.