नवी दिल्ली – रशिया-युक्रेन युद्धात हॉलिवुडमधील अँजेलिना जोली, शॉन पेन आणि मार्क रफेलो यांनी उघडपणे रशियाला पाठिंबा दिला आहे. अभिनेता लिओनार्दो डीकॅप्रियोने युक्रेनासठी एक कोटी अमेरिकी डॉलरची देणगी दिली आहे. म्हणजेच सुमारे 76 कोटी रुपये. युद्धग्रस्त युक्रेनसाठी हा मोठीच मदत ठरली आहे. मात्र हॉलिवुडमधील अनेक सेलिब्रिटींनी याआधी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासमवेत विविध कार्यक्रमांत हजेरी लावलेली आहे.
पुतीन यांच्या नेतृत्वाखालील रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर हॉलिवुडमधील वॉर्नर ब्रदर्स, द वॉल्ट डिस्ने कंपनी, सोनी पिक्चर्स, परामाऊंट, युनिव्हर्सल या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रशियात त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन रोखले. सोनीचा मॉर्बिस, परामाऊंटचा सॉनिक द हेजहॉग-2, युनिव्हर्सलचा मायकेल बेज अँब्युलन्स हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेले नाहीत. ही चित्रपटविषयक तात्पुरती बंदी सोडली तरी हॉलिवुडमधील काही दिग्गज वेळोवेळी पुतीन यांच्या प्रेमात पडलेले दिसतात.
2003 मध्ये पुतीन यांनी पॉल मॅकार्टनीला मॉस्कोमधील रेड स्क्वेअरमधील संगीत कार्यक्रमाला बोलवले होते. यावेळी पुतीन यांनी पॉलबरोबर छायाचित्रेही काढून घेतली होती. त्यावेळी पॉलने गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, कॅमेऱ्यांसमोरच आमची पुतीन यांच्याशी भेट झाली. नंतर त्यांनी सगळ्या पत्रकारांना जाण्यास सांगितले, दुभाष्यालाही पाठवून दिले, कारण ते इंग्रजी अतिशय छान बोलतात. आम्ही बराचवेळ गप्पा मारत होतो. त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींविषयी त्यावेळी सांगितले. ते अतिशय प्रेरणादायी होते.
त्यावेळी क्रेमलिनमध्ये पॉलने सादर केलेले लेट इट बी चे अकॉस्टिक व्हर्जन ऐकून पुतीन आनंदीत झाले होते.
2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग येथील सेव्ह टायगर्स मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल पुतीन यांनी अभिनेता लिओनार्दो डिकॅप्रियोचे कौतुक केले होते. त्यावेळी त्याच्या विमानाचे इंजिन बंद पडल्याने आणि जोरदार वादळाचा सामना करताना दुसऱ्या इंजिनातही बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. सगळ्या अडचणींवर मात करून तो मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल पुतीन यांनी त्याचे आभार मानले होते. त्यावेळी सेव्ह टायगर्स मोहिमेसाठी त्याने दहा लाखांची देणगी दिली होती.
71 वर्षीय स्टीव्हन सीगल यांची रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2018 मध्ये अमेरिकेसोबतच्या माणुसकीविषयक संबंधांचे विशेष दूत म्हणून नियुक्ती केली होती. त्यामध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातील मानवी अधिकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. जेव्हा त्यांना रशियाचे नागरिकत्व प्रदान करण्यात आले तेव्हा युक्रेनने राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून त्यांच्यावर युक्रेनमध्ये येण्यास बंदी घातली.
बेवॉचमुळे भारतात प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री पामेला अँडरसनच्या मुलाखतीची एक क्लिप सध्या नव्याने व्हायरल होती आहे. त्यामध्ये तिने प्राणीहक्क कार्यकर्ती म्हणून काम करताना पुतीन यांच्यासमवेत मैत्रीचे संबंध कसे निर्माण झाले हे सांगितले आहे. रशियात सील माशांच्या शिकारीवर बंदी घालावी तसेच रशियात या माशांची होणारी आयात थांबवावी अशी मागणी पामेलाने पुतीन यांच्याकडे केली होती. त्यानंतर लगेचच 2009 मध्ये पुतीन यांनी या माशांच्या शिकारीवर बंदी घातली.
2015 मध्ये पामेलाने व्हेलच्या मांसाच्या व्यापारावर बंदी घालण्याची मागणी केली आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या व्हेल माशांचे 1700 टन मांस घेऊन जपानकडे जाणाऱ्या जहाजाला रोखण्याची मागणी केली होती. त्यानंतर पुतीन यांनी ते जहाज रोखून योग्य ती कारवाई केली. पामेलाच्या या मुलाखतीची क्लिप अनेक देशांमध्ये टिकटॉकवर व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी विनोदी प्रतिक्रिया देताना पामेला अँडरसन हे अमेरिकेचे सिक्रेट वेपन असल्याचे म्हटले आहे.