पुणे – सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांसह कोयता व तलवार घेऊन उंड्री येथील होलेवस्ती चौकात दहशत माजवली. त्याने दहशत माजवताना एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर कोयता व तलवारीने वार केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सागर औताडे या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. त्याचे दोन साथीदार मात्र फरार झाले आहेत.
फिर्यादी ज्ञानोबा धोंडीबा कामठे (65) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे तोंड ओळखीचे आहेत. ते घरी असताना आरोपी त्याच्या साथीदारांसह कोयता व तलवार घेऊन तेथे आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत हातावर वार करुन जखमी केले. त्याला सोडविण्यास आलेल्या भावास देखील कोयत्याने वार करुन जखमी केले.
यानंतर परिसरात असलेल्या कारच्या काचेवर कोयता मारुन ती फोडली. परिसरात मंगळवारी भरदुपारी ही घटना घडल्याने दहशत माजली होती. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक कदम करत आहेत.