राम मंदिर अनंत काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल – पंतप्रधान मोदी

अयोध्या – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत आहे, अशा भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचे निर्माण होईल. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आज दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचे प्रतीक आहे.

इमारती नष्ट झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आपल्या मनात आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. कोणतेही काम करायचे असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचे प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी येतील. अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. यामुळे राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे.  या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे, असेदेखील पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.

इंडोनेशियात रामायण पूजनीय आहे. कंबोडिया, मलेशिया, थायलंड, इराण आणि चीनमध्ये राम कथांची माहिती मिळेल. नेपाळ आणि श्रीलंकेचाही संबंध जोडलेला आहे. अनेक देशांमधील लोकांना राम मंदिराचं काम सुरू झाल्याबद्दल आनंद होत असेल. राम मंदिर अनंत काळापर्यंत मानवाला प्रेरणा देईल. प्रभू श्रीरामाचा संदेश संपूर्ण जागापर्यंत कसा निरंतर पोहोचेल हे आपल्या वर्तमान आणि भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.