नवी दिल्ली – पूर्व दिल्लीतील गाझीपूर फूल बाजारमध्ये एका बेवारस बॅगमध्ये स्फोटके आढळली. सुमारे दीड किलो वजनाच्या या स्फोटकांची संहार क्षमता प्रचंड मोठी होती. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा हा कट उधळण्यात आला.
एक बेवारस पिशवी पडली असून त्यावर कोणी मालकी हक्क सांगत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत विशेष पथकाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यापाठोपाठ दहशतवादाचा मुकाबला करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा गटाला तेथे पाचारण करण्यात आले. अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळावर पाठवण्यात आले.
या स्फोटकांचा नियंत्रित स्फोट घडवून एनएसजीने ती निकामी केली. त्यात सुमारे दीड किलो वजनाची स्फोटके होती. त्या स्फोटकांची क्षमता मोठा संहार करण्याची होती.
बेवारस बॅग सापडल्याचे लक्षात येताच बाजारपेठ तातडीने निर्मनुष्य करून नाकाबंदी करण्यात आली. या स्फोटकांच्या काढून घेतलेल्या नमुन्यांच्या न्यायवैद्यक परीक्षणानंतर त्याबाबत माहिती देता येईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रथम दर्शनी या स्फोटकांमध्ये नायट्रेट असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
स्फोटक कायद्यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कोणी एका व्यक्तीने अथवा एखाद्या गटाने या गर्दीच्या बाजारात प्रजासत्ताक दिनाच्या आधी स्फोट घडवण्याच्या उद्देशाने ही स्फोटके पेरली असावीत, असा पोलिसांचा संशय आहे. ही पिशवी अधिकाधिक जीवित हानी होईल, अशा गर्दीच्या ठिकाणी ठेवली होती.
दिल्ली पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, विशेष शाखा आणि एनएसजी मिळून हा तपास सुरू करण्यात आला असून बाजारपेठेत असणाऱ्या 15 सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण ताब्यात घेतले आहे. त्यातून बाजारात ही बॅग आणण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.