नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बिहार पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत,एका मोस्ट वॉंटेड गुंडाला अटक केली आहे. आझाद अली (वय 43) असे आरोपीचे नाव असून तो बिहारच्या सिवान जिल्ह्यातील रहिवासी आहे.
शुक्रवारी पोलिसांना माहिती मिळाली की अली त्याच्या एका साथीदाराला भेटण्यासाठी राजघाटजवळील एका ठिकाणी येणार आहे. तेथेच रात्री सव्वा अकरा वाजता अलीला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, पोलिसांनी सांगितले की अली 4 एप्रिल रोजी सिवान येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांना हवा होता.
या गोळीबारात पाच जण जखमी झाले होते. अली याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यात अपहरण, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.