कराची – पाकिस्तानात तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी कराची शहरातील पोलीस प्रमुखांच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या वेळी झालेल्या चकमकीत किमान 5 दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांच्या सशस्त्र हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कडवा प्रतिकार करून या इमारतीवरील ताबा पुन्हा मिळवला आहे. कराची शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात असलेल्या या पाच मजली पोलीस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.
दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जवळपास चार तासांपेक्षा अधिक वेळ जोरदार धुमश्चक्री सुरू होती. रात्री 10.30 वाजता ही चकमक समाप्त झाली. या चकमकी दरम्यान दोन पोलीस शिपाई, एक रेंजर कर्मचारी आणि एका सामान्य नागरिकासह अन्य चौघे मारले गेले. चकमकीदरम्यान 5 दहशतवादी मारले गेले असे वरिष्ठ सुक्षा अधिखाऱ्यांनी सांगितले. यातील तिघे जण सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मारले गेले. तर दोघाजणांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून स्वतःला उडवून दिले. त्यांनी घडवलेल्या स्फोटामुळे इमारतीतील एका मजल्याचे नुकसान झाले.
कराची पोलीस मुख्यालयावरील दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावण्यात आला आहे, असे सिंध प्रांताच्या सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जखमी झाल्याबद्दल 17 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.
मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू
या पोलीस मुख्यालयावर किती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, याबद्दल भिन्न आकडेवारी पुढे येते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 8 दहशतवादी होते. या पोलीस मुख्यालयाच्या परिसरात कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच इमारतीमध्ये शोध मोहिमदेखील केली जात आहे. यानंतरच दहशतवाद्यांच्या नक्की आकड्याबाबत सांगता येऊ शकेल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दोन कार सापडल्या
पोलीस मुख्यालयाच्या मागच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कार उभ्या असल्याचे आढळून आले. या दोन्ही कारचे सर्व दरवाजे उघडेच होते. या कारमधून दहशतवादी संध्याकाळी 7.10 वाजता आले होते. श्वानपथकाद्वारे या दोन्ही कारची तपासणी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांनी आपल्याबरोबर आधुनिक शस्त्रे आणि स्फोटकेही आणली होती.