मुंबई – काही महिन्यांच्या संघर्षानंतर काल शुक्रवारी निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. निवडणुक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी धक्कादायक मानला जात आहे. आयोगाच्या निर्णय सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि निवडणुक आयोगावार जोरदार टीका केली. तसेच कार्यकर्त्यांना खचून जावू नका म्हणत त्यांचे मनोबल वाढवले.
आज उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात ओपन कारमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या भाषणाच्या शैलीचा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाची संबंध जोडला जात आहे. कार्यकर्त्यांना पुन्हा एका बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची आज आठवण झाली आहे. शिवसेना पक्ष स्थापनेनंतर 1969 साला शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला होता. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या कारच्या टपावर उभे राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. आणि पक्षासाठी धगधगत्या ज्वाळेप्रमाणे झोकून देण्याचे आवाहन केले होते. आज उद्धव ठाकरे यांच्या कारमधून केलेल्या भाषणाचा त्या भाषणाशी संबंध शिवसैनिकांकडून जोडला जात आहे.
दरम्यान, काल सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक धनुष्यबाण दाखविला आणि सांगितले की, हा धनुष्यबाण आमच्या देवघरातील आहे. त्याची आम्ही दररोज पूजा करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी या धनुष्यबाणाची पूजा केली होती. निवडणुक आयोगाने जरी निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला असला तरीही हा धनुष्यबाण आमच्याच घरात राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच शिंदे गटाने धनुष्यबाण चोरून घेतला असल्याची टीका त्यांनी केली. तसेच भाजप सरकारवर देखील जोरदार टीका केली.