लहान मुलीसोबत चार नागरिक जखमी
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात गोळीबार करत दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका लहान मुलीसोबत चौघे नागरीक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दिली आहे. दहशतवाद्यांचे हे निर्दयी कृत्य आहे. दहशतवाद्यांनी सोपोरमधील डांगेरपोरा येथे केलेल्या गोळीबार केला असून यामध्ये लहान मुलगी उस्मा जान हिच्यासहित चौघे जखमी झाले आहेत, असे त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मोहम्मद असरफ दार, मोहम्मद रमझान दार आणि अर्शीद हुसेन अशी जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळीबारानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून तपास सुरु आहे, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलीस प्रवक्त्याने दिली आहे.
दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी काही संशियत दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील परिम पोरा परिसरात गोळीबार करत एका नागरिकाला जखमी केले होते. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खो-यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी हे हल्ले करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे.