सातारा (प्रतिनिधी) – महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात सकाळी दवबिंदू गोठल्याचे आज पाहयला मिळाले. बोट क्लबवर तसेच परिसरातील छोट्या झुडुपांवर गोठलेले दवबिंदू पाहताच पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. महाबळेश्वरमध्ये आज पहाटे 11.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली. महाबळेश्वरचे तापमान काही दिवसांत आणखी खाली येईल, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.
ख्रिसमसच्या सुट्या व नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. वाढत्या थंडीमुळे पर्यटक आनंदून गेले आहेत. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणी पर्यटकांनी शेकोट्यादेखील पेटवल्या होत्या.
करोनामुळे सहा ते आठ महिने महाबळेश्वरमधील पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायावर परिणाम झाला होता. पर्यटकांची पावले पुन्हा महाबळेश्वरकडे वळल्याने येणारा हंगाम चांगला जाईल, असा आशावाद महाबळेश्वरमधील व्यावसायिकांनी व्यक्त केला.
साताऱ्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. सोमवारी साताऱ्यात या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली. थंडी वाढल्यामुळे यवतेश्वर घाट, कुरणेश्वर, संगमनगर, अजिंक्यतारा किल्ला याठिकाणी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली. महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्याचा पारा दोन अंशांनी कमी होता.