इंग्लंडची मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी
साउदम्पटन – आयसीसीच्या पहिल्याच वर्ल्ड कप सुपरलिग स्पर्धेतील पहिल्याच मालिकेत यजमान इंग्लंडने आयर्लंडचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पराभव केला व एक सामना बाकी असतानाच मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना द्विशतकी धावांचा आकडा गाठला होता. मात्र, इंग्लंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने 82 धावांची आक्रमक खेळी करत संघाच्या विजयात मोलाटा वाटा उचलला. तोच सामनावीर ठरला. यापूर्वी येथेच झालेला पहिला सामनाही इंग्लंडने जिंकला होता.
शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत आयर्लंडचा कर्णधार अँडी बालब्रिनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाच्या धावांचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच त्यांचे 6 फलंदाज तंबूत परतले होते. पहिल्या सामन्यातील सरस खेळी करणाऱ्या कर्टिस कॅंफरने 68 धावांची खेळी करत तळातील फलंदाजांना हाताशी धरत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला.
इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज आदिल रशीदने 3 तर, डेव्हिड विली व साकीब महंमद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पाठलाग करताना यजमान इंग्लंडची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर जेसन रॉयला भोपळाही फोडता आला नाही. मात्र, बेअरस्टोने एक बाजू सांभाळत संघाचा डाव सावरला. त्याला सॅम बिलिंग व डेव्हिड विली यांनी सुरेख साथ देत संघाचा विजय साकार केला. सामन्यातील 33 व्या षटकातच इंग्लंडने मालिका विजय मिळवला. आयर्लंडकडून जोश लिटीलने 3 तर, कर्टिस कॅंफरने 2
बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड – 50 षटकांत 9 बाद 212. (कर्टिस कॅंफरने 68, आदिल रशीद 3-34, डेव्हिड विली 2-48, साकीब महंमद 2-45). इंग्लंड – 32.3 षटकांत 6 बाद 216. (जॉनी बेअरस्टो 82, डेव्हिड विली नाबाद 47, सॅम बिलिंग नाबाद 466, जोश लिटील 3-60, कर्टिस कॅंफर 2-50).