पुणे(दि. 28) – एम टेनिस अकादमी आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात क्वालिफायर युगंधर शास्त्री, अंशुल पुजारी, नमिश हूड या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात नमिश हूड याने आपलाच राज्य सहकारी तिसऱ्या मानांकित क्रिशय तावडेचा 6-1, 7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या बिगरमानांकीत युगंधर शास्त्रीने चौथ्या मानांकित आरव बेलेचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
अंशुल पुजारीने सहाव्या मानांकित वीर चत्तुरवर 6-0, 6-3 असा सनसनाटी विजय मिळवला. आर्यन किर्तने याने शौर्य बोऱ्हाडेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. मुलींच्या गटात ओजसी देगमवार हिने अनिका नायरचा 6-0, 6-3असा तर, प्रांजली पांडुरेने रिया बांगलेचा 6-0, 6-2 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन नवसह्याद्री सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ, नवसह्याद्री सोसायटीच्या क्रीडा समितीचे विनायक करमरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे संचालक केतन धुमाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.