ठाणे – खेलो इंडियाच्या अकादमी व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटनचे प्रशिक्षण केंद्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये सुरू करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया योजनेतून देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये 1 हजार खेलो इंडिया केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षणासाठी केंद्र सुरू करण्यात आले असून राज्यातील हे तिसरे तर मुंबई विभागातील एकमेव केंद्र आहे.
या प्रशिक्षण केंद्रासाठी 12 वर्षांखालील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 15 मुले आणि मुलींचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॅडमिंटनमध्ये श्री शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेचे प्रशिक्षक विघ्नेश देवळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या खेळाडूंना हे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सत्रात हे केंद्र सुरु राहणार आहे. तसेच खेळाडूंना बॅडमिंटनचे कीटही दिले जाणार आहे.