पिंपरी– करोना काळात करोनाबाधित रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या शहरातील 14 खासगी रुग्णालयांना नोटीस दिल्या आहेत. पंधरा दिवसात वाढीव बिलांचे परतावे करण्याचे आदेश महापालिकेने या रुग्णालयांना दिले आहेत.
करोनाच्या कालखंडात राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांना करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती. ही परवानगी देताना राज्य शासनाने निर्धारित केलेले दर आकारावेत, असे सूचित केले होते. पिंपरी चिंचवड शहर परिसरात शासकीय आणि खासगी अशी एकूण 137 रुग्णालये आहेत. त्यात पहिल्या लाटेत वाढीव बिलांच्या तक्रारी आल्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बिलांचे परीक्षण करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
त्यानुसार महापालिका वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी लेखा विभागाचे अधिकारी यांचे पथक स्थापन केले होते. त्यासाठी अतिरिक्त शंभर जणांचे मनुष्यबळ देण्यात आले होते. या पथकाने प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन बिलांचे लेखापरीक्षण केले. त्यानंतर 48 रुग्णालयांना नोटीस दिल्या होत्या. दरम्यान, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेतही बिलांच्या तक्रारी आल्या. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. महापालिकेकडे विविध रुग्णालयांसंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार बिलांची तपासणी केली. दुसऱ्या लाटेत 14 रुग्णालयांनी वाढीव बिले दिल्याचे आढळून आले. त्या रुग्णालयांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.