पुरंदरची करोना पाठ सोडेना : एकूण 13 बाधित
सासवड- पुरंदर तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढून ती आता तब्बल 13 इतकी झालेली आहे. बुधवार (दि.11) पुरंदर तहसीलदार यांच्या वाहनचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
हा कर्मचारी शनिवारपासून तहसील कार्यालयात कामावर आलेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यास सोमवारी लक्षणे दिसून आल्याने मंगळवारी त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठवले होते. या कर्मचाऱ्यांचा अहवाल (दि.10) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
सध्या या कर्मचाऱ्यास पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर पुढील उपचार सुरू असून या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत पुरंदर तालुक्यातील करोना पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या 13 झाली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयात एकूण 5 रुग्ण उपचार घेत असून 6 रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत.