नेवासे तालुक्यातील प्रकार : सुट्टीच्या दिवशी अंधव्यक्ती मदतीसाठी निधी संकलन
मुलांची 10 ते 12 किमी दारोदारी भटकंती
शिक्षण विभाग अनभिज्ञ
नेवासे – तालुक्यात अंधव्यक्ती मदतीसाठी निधी संकलित करण्यासाठी गावनगाव पिंजून काढण्यात येत आहे. यासाठी संस्थेकडून किशोरवयीन मुले व मुलींना निधी गोळा करण्यासाठी घरोघरी तसेच विविध शाळांमध्ये पाठवून वेठीस धरले जात आहे. याबाबत शिक्षण विभाग पूर्णपणे अनभिज्ञ असून त्यांना या प्रकाराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. श्रीरामपूर येथील नॅशनल असोशिएशन फॉर द ब्लइंड या शाखा या संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या अधिपत्याखाली हा निधी गोळा करण्यात येत आहे.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाशी भ्रमणध्वनीवरुण संपर्क करून अंध व्यक्तीच्या मदत निधीबाबत विचारपुस केली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊन भ्रमणध्वनी खंडित केला. शाळेला सुट्टी असताना देखील रविवारी सकाळी अंदाजे 11 ते 12 च्या सुमारास नेवासे तालुक्यातील कुकाणे व्यापारी पेठेत किशोरवयीन मुली अंधव्यक्तीच्या मदतीसाठी निधी संकलन कार्ड घेऊन दारोदार, दुकान व अन्य दुकानात निधी मागत फिरत असल्याचे आढळून आले. या मुलीकडे विचारपूस केली असता त्या मुलींनी बोलण्यास नका दिला. सर बोलतील असे सांगून मुलींनी काढता पाय घेतला, मात्र या किशोरवयीन मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार? रस्त्याने अपघाताची जबाबदारी कोण घेणार?
या मुली शाळा व घरापासून अंध निधी संकलनसाठी तब्बल 10 – 12 किलोमीटर अंतरापर्यंत येत असल्याने या शाळेकडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोण बदलला असल्याचे वास्तव चित्र सध्या निर्माण झाले आहे. अंध व अन्य निधि संकलन करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेऊन शाळांना हे पत्र देऊन विद्यार्थ्यांना हा निधि संकलित करण्यासाठी बंधनकारक होते. मात्र, या अंध निधीसाठी कोणतीच परवानगी या शाळेला नसल्याचे आढळून आले. या शाळेत एक हजार कार्ड वाटप केल्याचे समजत असून यापैकी 500 कार्ड विद्यार्थ्यांना देऊन सध्या निधी संकलन करण्याचे काम हे मुले करत असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
दोन दिवस सुट्या असल्याने शाळा सुरू झाल्यावर या प्रकारची चौकशी करू.
गलांडे गटशिक्षणाधिकारी