लखनौ – हनुमानाच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यानंतर पुजाऱ्यांनी मंदिरात पूजा केली. भाविकांकडून बजरंगबलीचा तसेच श्रीराम नामजप करण्यात आला त्यानंतर अश्रू येणे थांबले असा दावा केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात फतेहगंज भागात घनदाट जंगलात हनुमानाचे मंदिर आहे. हे प्राचिन मंदिर असून आजूबाजूच्या लोकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी काही लोक मंदिरात गेले असता त्यांना मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येताना दिसले. ही बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पोहोचली. लोक मंदिरात जमा होऊ लागले. आधी एका डोळ्यातून नंतर दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागल्याचे लोक सांगत आहेत. त्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी पूजा केली, तसेच भाविकांनी बजरंगबली, श्रीरामाच्या नावाचा जप केला त्यानंतर आता हनुमानाच्या मूर्तीतील डोळ्यांतून अश्रू येणे थांबले आहे.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये डोळ्याच्या बाजूने अश्रू वाहू लागल्याचे दिसत आहे. मात्र ही घटना नेमकी कशी घडली याबाबत स्पष्टता समोर आली नाहिए. येथिल स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की अशी घटना याआधी कधीही निदर्शनास आली नाही. परिसरातील गावांवर काहीतरी संकट येणार असल्याची ही चाहून आहे की काय अशी शंका परिसरातील गावकरी व्यक्त करत आहेत. रविवारी ही घटना घडल्याचे सांगितले जात असून सोमवारी या घटनेचा व्हिडीओ एका भक्ताने सोशल मीडियावर शेअर केला होता.
पूजेनंतर अश्रू थांबले –
मंदिराचे पुजारी रामबाबू महाराज यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही पूजा करण्यासाठी आलो तेव्हा डोळ्यातून पाणी येत होते, काही वेळाने आम्हाला दिसले की ते अजूनही बाहेर येत आहे, त्यानंतर आम्ही सर्वांना याबाबत कळवले. आजूबाजूचे लोक आले, आता मंदिरात पूजा केली जात आहे. राम नामाचा जप केला जात आहे. आता अश्रू येणे थांबले आहे. या भागात काहीतरी संकट आले असावे. सध्या पूजेनंतर अश्रू येणे थांबले आहे.
दरम्यान, या आधी 10 एप्रिल 2023 रोजीही वाराणसीच्या चोलापूर ब्लाॅक येथील एका मंदिरात हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावेळी बजरंग बलीच्या दगडी मूर्तीतून अश्रू येण्यामागचे कारण काय? तो खरोखर दैवी चमत्कार आहे की वैज्ञानिक घटना. याबाबत तज्ज्ञांनी याला वैज्ञानिक घटना म्हटले होते. बजरंगबलीच्या मूर्तीवर रोज शेंदूर लावला जातो. शेंदूरमध्ये मर्क्युरिक ऑक्साईड मुबलक प्रमाणात असते. हे पाणी खूप वेगाने शोषून घेते. काही वेळाने तेच पाणी थेंबाच्या रूपात मूर्तीवर दिसते, असे वैज्ञानिकांनी म्हंटले होते.