वर्षाला अडीच कोटींच्या बाकडांची खरेदी

आठ वर्षांत पालिकेकडून 20 हजारांहून अधिक स्टिल बाकडे खरेदी

 

 

पुणे – शहर विकासासाठी प्रामाणिक कर भरणाऱ्या पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करणारा पुणे महापालिकेचा आणखी एक नवीन पॅटर्न समोर आला आहे. 2012 नंतर महापालिकेने शहरासाठी वर्षाला सरासरी अडीच कोटी रुपयांच्या स्टिल, सिमेंट तसेच इतर प्रकारच्या बाकडांची खरेदी केली आहे. त्यानुसार, गेल्या आठ वर्षांत 20 हजारहून अधिक बाकडे महापालिकेने 20 ते 25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहेत.

2018 पर्यंत ही बाकडे क्षेत्रीय कार्यालयांनी घेतली. त्यानंतर, 2018 ते 2020 या कालावधीत मध्यवर्ती भांडार विभागाने तब्बल साडेसहा कोटींच्या बाकडांची खरेदी केली. त्यापेक्षाही धक्‍कादायक बाब म्हणजे ही बाकडे नेमकी कुठे आहेत आणि त्याचा वापर खरच नागरिक करतात का याचे कोणतेही उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही. शहरात 2012 नंतर खरेदी केलेल्या बाकडांबाबत नगरसेविका छाया मारणे यांनी जानेवारीच्या मुख्यसभेसाठी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याच्या उत्तरात पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

महापालिकेकडून गेल्या काही वर्षांत शहराचे सुशोभिकरण तसेच नागरिकांना सुविधा देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जात असल्याचे समोर आले. प्रामुख्याने नगरसेवकांना प्रभागातील विकासकामांसाठी देण्यात येणाऱ्या “स’ यादीमधून ही उधळपट्टी केली जात असल्याचे वास्तव अनेकदा समोर आले आहे. त्यात, नागरिकांना बसण्यासाठी देण्यात येणाऱ्या बाकडांचाही समावेश आहे. दरवर्षी महापालिका शहरातील नागरिकांच्या नावाखाली नगरसेवकांच्या निधीतून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची स्टिलची बाकडे खरेदी करत आहे.

2012 ते 18 या सहा वर्षांत पालिकेने जवळपास 15 कोटींच्या बाकडांची खरेदी केली होती. त्यात, 2018 मध्ये चीनी बनावट असलेली काही बाकडे दुप्पट दराने महापालिकेच्या माथी मारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने महापालिकेने ही बाकडे खरेदी मध्यवर्ती भांडार विभागाच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या विभागाने अवघ्या दोन वर्षांत नगरसेवकांच्या मागणीनुसार तब्बल साडेसहा कोटींची बाकडे खरेदी केली आहेत. मात्र, ही खरेदी करताना नागरिकांची बाकडांसाठी मागणी आहे का, बाकडांचा खरच उपयोग होतो का याची कोणतीही तपासणी न करताच ही खरेदी केली जात आहे.

सोसायट्या, ऑफिसात बाकडे

सर्वसामान्य नागरिकांच्या नावाखाली ही बाकडे खरेदी केली असली तरी, यातील अनेक नगरसेवकांच्या कार्यालयाची शोभा वाढवित आहेत; तर काही बाकडे सार्वजनिक गणपती मंडळे, खासगी सोसायट्यांमध्ये बसवली आहेत. तर, अनेक बाकडे रस्त्याच्या कडेला बसविण्यात आली असून पथारी व्यावसायिकांकडून त्याचा ताबा घेत ती ग्राहकांना बसण्यासाठी वापरली जात असल्याचेही अनेकदा समोर आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.