सातारा – काही शिक्षकांना करोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी विविध प्रकारचे कामकाज सोपविण्यात आले आहे. मात्र, 55 वर्षापेक्षा जास्त वय आहे, अशा शिक्षकांना करोनासंदर्भातील कामकाज देण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
55 वर्षापेक्षा जास्त वय आहे, अशा शिक्षकांना कामकाज दिले असल्यास त्यांना दिलेले आदेश तात्काळ रद्द करण्यात येऊन पर्यायी व्यवस्था करावी. करोनासंदर्भातील कामकाज देताना एका शिक्षकास जास्तीत जास्त 15 दिवस कामकाज देण्यात यावे. 15 दिवसांपेक्षा जास्त कामकाज देण्यात येऊ नये. तसेच ज्या शिक्षकांना ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार आहेत, अशा शिक्षकांना त्यांचे वय 55 वर्षापेक्षा कमी असले तरी त्यांना करोनासंदर्भात कामकाज देऊ नये, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.