स्वच्छ शहराच्या प्रयत्नांचा ‘कचरा’

पुण्याला सिंगल स्टारचा दर्जाही मिळेना; राज्यात फक्‍त नवी मुंबईला 5 स्टार दर्जा

पुणे – केंद्र शासनाच्या “गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत शहराचे फाइव्ह स्टार मानांकन महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, यात केंद्राकडून पालिकेस 1 स्टार दर्जाही मिळालेला नाही. त्यामुळे देशातील पहिल्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर पुण्याचा भ्रमनिरास झाला आहे. केंद्रशासनाने या स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे प्रशासनाने वर्षभर केलेल्या प्रयत्नांचा “कचरा’ झाला आहे.

स्वच्छ शहर स्पर्धेसाठी केंद्रशासनाने स्टार रेटिंग बंधनकारक केले होते. त्यानुसार, महापालिकेने मागील वर्षी या रेटिंगसाठी 3 स्टार जाहीर केले. त्यावेळी पालिकेस 2 स्टार मिळाले होते. तर स्वच्छतेत पुण्याचा क्रमांक 37 वर गेला. त्यावर प्रशासनाने मागील वर्षभरात रॅकिंग सुधारण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. त्यात हिंमत दाखवून या वर्षीसाठी 5 स्टार रेटिंग जाहीर केले. त्यानुसार 100 टक्के कचरा संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करणे असे निकष होते.

तसेच शहराची एकत्रित कचऱ्याची स्थिती आणि क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वच्छतेची स्थिती असे गुणांकन होते. या शिवाय, पहिल्यांदाच केंद्राने नदी, नाले आणि शहरातील तलाव स्वच्छतेसाठी आवश्‍यक उपाय योजनांचाही स्पर्धेत समावेश केला होता. तर पालिकेने शहरात तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नेमत दोन महिने शहरात कुठेही कचरा तसेच अस्वच्छता राहणार नाही, यासाठी खबरदारी घेतली होती. तत्कालिन आयुक्त सौरभ राव यांनीही तब्बल दीड महिना या कामासाठी दिला होता. मात्र, आता आलेल्या निकालाने महापालिकेलाही धक्का बसला आहे.

…म्हणून पुणे पिछाडीवर
पुण्यात नदी स्वच्छतेत त्रुटी, नालेसफाई तसेच तलावांमध्ये अस्वच्छता असल्याचे परीक्षकांना आढळल्याने या श्रेणीत महापालिकेची लक्षणीय पिछेहाट झाली आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयास स्वच्छतेत 0 गुण मिळाले. त्यामुळे सहा प्रमुखपैकी 2 निकषांत पालिकेची कामगिरी सुमार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. एका बाजूला 14 क्षेत्रीय कार्यालयांना 75 ते 100 गुण मिळाले, तर एकाच क्षेत्रीय कार्यालयास 0 गुण मिळाल्यावर शहराचे गुणांकन होऊ शकत नाही. त्यामुळे या गुणांकणावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

केंद्र शासनाच्या निकषांनुसार सर्व पूर्तता करण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेस मिळालेले गुण आम्हालाही धक्कादायक आहेत. त्यामुळे या गुणांची पडताळणी करण्याची विनंती करणार आहोत.
– ज्ञानेश्‍वर मोळक, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.