प्राचार्य रमेश बुदगुडे यांचा जन्म 26 ऑगस्ट 1967 मध्ये झाला. ते मूळचे भोर तालुक्यातील भाबवडीचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण भाबवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण भोर श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील आबासाहेब गरवारे विज्ञान महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. बीएसस्सीची पदवी संपादनानंतर त्यांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. बीएस्सी, एम. ए. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. हे शिक्षण त्यांनी अनंतराव थोपटे महाविद्यालय, आणि सौ. निर्मलाताई अध्यापक महाविद्यालयात घेतले.
बुदगुडे यांनी 1 जुलै 1988 मध्ये संगमनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल ऍण्ड ज्यूनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. 1992 ते 2004 पर्यंत खानापूर येथे सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहिले. तेरा वर्षांनंतर त्यांना 2004 मध्ये बदली झाली. संगमनेर येथे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राचार्य/मुख्याध्यापकपदी बढती मिळाली. 2007 मध्ये कारी येथील कान्होजी जेधे विद्यालयात रूजू झाले. 2011 पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील सद्गुरू श्री नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात त्यांची बदली झाली. सरांनी या विद्यालयाचा कायापालट करून टाकला. लोकसहभागातून 40 ते 50 लाख रुपयांची भव्य इमारत बांधली. हे लक्षवेधी काम शिक्षण क्षेत्राची व्यापकता ठरली आहे.
2019 मध्ये खानापूर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये रुजू झाले. बुदगुडे सर यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. पल्स पोलिओ, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले. स्काऊट – गाईड प्रशिक्षणात सहभाग घेतला. राज्यस्तरीय सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणात सहभाग घेतला. 2017-2018 मध्ये “”करिअर विज्ञान” हे प्रमाणपत्र मिळाले आहे. संचालक, महाराष्ट्र राज्य सै. सं. व प्र. प. पुणे, तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून जिल्हास्तर विज्ञान विषयात त्यांचा सहभाग होता. त्यांचा सहभाग विद्यार्थी, शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.
अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ राष्ट्रीय एकात्मता व परिषद संयोजन समितीकडून कोल्हापूर येथे 2007 मध्ये राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप मिळाली. एसएससी परीक्षा नियंत्रण (बिल्डींग कंडक्टर) म्हणून काम केले. शिवाजी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, श्री नागेश्वर विद्यालय, आंबवडे, भोर श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात बिल्डींग कंडक्टरपदी काम केले.
बुदगुडे यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचा विचार केला आहे. व्यक्तीमत्व विकासासाठी योगदान दिले आहे. बुदगुडे यांनी आजारी विद्यार्थ्याला आर्थिक मदत केली आहे. गरजू विद्यार्थ्यांना (गरीब) वह्या तर 30 विद्यालयातील विद्यार्थ्यांना कंपास बॉक्सचे वाटप केले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले आहे. हे भोरसाठी भूषणावह ठरले आहे.
बुदगुडे यांनी आतापर्यंतच्या सेवाकार्यकाळात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 19 पुरस्कार आणि बक्षिसांनी गौरविले आहे. हे भोर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील विरळ उदाहरण आहे. 1992-93 मध्ये पुणे जिल्हा विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक टेलिव्हीजन उपक्रम राबविला. त्यावेळी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. सरांनी तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम राबविला. 2016-2017 मध्ये यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धेत तालुकास्तरावर शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. भोर तालुका विज्ञान प्रदर्शनात लक्षवेधी कामगिरी केली आहे. 2019 मध्ये आयआयबीएम ग्रुप ऍण्ड इन्स्टिट्यूट पुणे यांच्याकडून सन्मानित केले आहे. नवी मुंबई येथे भूगोल प्रज्ञाशोध केंद्रात सहभाग घेतला. 2019 मध्ये भोसरी येथे कृतीशील शाळा पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, कोंढवा, पुणे येथील “गुणवंत मुख्याध्यापक’ म्हणून त्यांना गौरविले आहे. 2017 मध्ये रोटरी क्लबतर्फे नॅशनल बिल्डर ऍवॉर्ड हा तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. 1995 मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला आहे. जिल्हास्तरीय स्काऊटमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. जिल्हास्तर गुणवंत पुरस्कार मिळाला आहे.
2018-2019 मध्ये ते भोर रोटरी क्लबचे अध्यक्ष होते. त्यावेळी शिक्षण क्षेत्रातील भरीव काम केले. 2018-2019 पासून पुणे विभाग माध्यमिक शिक्षक-शिक्षिका सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. 2021-2025 मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आहे. शिक्षण, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आदी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले आहे. (स्व) एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानतर्फे बुदगुडे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाला आहे. सासवड येथे त्यांना गौरविले आहे. 2016 मध्ये बुदगुडे यांनी सहारा पॅकेजिंग कंपनीची स्थापना केली आहे. कंपनीच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. शिक्षण क्षेत्रातील ज्ञानमंदिरात त्यांनी प्रज्जवलित केलेली आजही ज्योती तेवत आहे. 4 जुलै 2020 मध्ये पुण्यात प्राचार्य रमेश बुदगुडे यांना चाणक्य सन्मान पुरस्कार – (आयआयबीएम) मिळाला आहे.
प्राचार्य रमेश बुदगुडे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
बुदगुडे यांची कौटुबिक पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांचे वडिल ज्ञानोबा दगडोबा बुदगुडे हे भाबवडी येथील ग्रामपंचायतीच्या स्थापनेवेळी पहिले सरपंच होते. आई राधाबाई बुदगुडे या गृहिणी होत्या. शेतकरी आणि राजकीय वारसात बुदगुडे यांचे बालपण गेले. वडिल ज्ञानोबा बुदगुडे आणि आई राधाबाई यांच्या संस्कारछत्रात त्यांच्या जीवनाला आकार मिळाला. दोन भाऊ आणि एक बहिण, असे कुटुंब आहे. या कुटुंबाला राजकीय वारसा आजही आहे. बुदगुडे सर यांची बहिण ताई या सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदयदादा कबुले यांच्या पत्नी आहेत. तर बुदगुडे सर यांच्या पत्नी सौ सविता या उदयदादा कबुले यांच्या भगिणी आहेत. मोठे बंधू अनंत बुदगुडे हे महानंदा डेअरीत सहायक व्यवस्थापक म्हणून काम करून निवृत्त झाले आहेत. बुदगुडे यांचा मुलगा कुणाल हे बी. ई. (कॉम्प्युटर) ही पदवी संपादन करून सहारा पॅकेजिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कुणाल यांची पत्नी पल्लवी या सहारामध्ये संचालकपदी आहेत. मुलगी स्नेहा उच्चशिक्षित आहेत. त्यांचे पती योगेश चंदनशिव हे खंडाळा (ता. सातारा) येथे नायब तहसीलदारपदी आहेत. कुटुंबातील कृषी, शिक्षण, राजकीय, उद्योग, प्रशासनाचा मिलाफ झाला आहे.
“राजगड ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री श्री. अनंतरावजी थोपटे साहेब, संस्थेच्या सचिव (स्व) निर्मलाताई थोपटे यांनी मला शैक्षणिक कामकाजाची संधी दिली. त्यामुळे मी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देऊ शकलो. राजगड ज्ञानपीठ संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार संग्रामदादा थोपटे, राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या सचिव डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांचे मार्गदर्शन शैक्षणिक वाटचालीला ऊर्जा देणारी ठरली आहे. थोपटे साहेबांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात भोर- वेल्हे तालुक्याचा कायापालट केला. हे सर्व काम करताना या भागात शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, या दूरदृष्टीतून थोपटे साहेब हे शिक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी राजगड ज्ञानपीठ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून भोर- वेल्ह्यात शिक्षणाचे जाळे उभे केले आहे. त्यातून ग्रामीण डोंगरी भागातील मुले आज उच्च शिक्षण घेऊ लागली. थोपटे साहेबांच्या दूरदृष्टीतून भोर, वेल्हे तालुके शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध झाले आहेत. अनेक शिक्षक, अभियंता, प्रशासकीय अधिकारी निर्माण होऊन ते देश उभारणीत योगदान देत आहेत. त्यापैकीच मी एक.”
– प्राचार्य रमेश बुदगुडे,
सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय,
ऍण्ड ज्युनिअर कॉलेज, खानापूर.
लक्षवेधी कामगिरी
बुदगुडे यांनी शिवाजी विद्यालय नसरापूर येथे वरिष्ठ वेतन श्रेणी सेवांतर्गत दोनवेळा प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. पुरंदर, भोर, वेल्हे तीन तालुक्यांसाठी काम केले आहे. मुख्याध्यापक कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला आहे. मुख्याध्यापकांकरिता शालेय नेतृत्वगुण विकास कार्यक्रमात सहभाग घेतला. वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती केली. कोकमठाण (शिर्डी-कोपरगाव) येथे जिल्हास्तरीय तज्ज्ञांच्या प्रशिक्षणात सहभाग घेतला. नारायणपूर येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा घेण्यात आला. संस्थापक अध्यक्ष, अनंतरावजी थोपटे साहेब, मानद सचिव डॉ. भाग्यश्री पाटील यांनी 2013 ला शिक्षकदिन शुभेच्छापत्र दिले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या तज्ज्ञ मार्गदर्शक राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी निवड झाली. यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शक प्रशिक्षणात सहभाग घेतला.
खानापूर विद्यालयाच्या स्थापनेत थोपटे साहेबांचे योगदान
अनंतराव थोपटे साहेब यांनी 15 जून 1992 मध्ये खानापूर येथे सरनोबत विद्यालयाची स्थापना केली. पहिल्या वर्षी चार मुलांवर शाळा सुरू झाली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मुलांची संख्या वाढल्याने पोल्ट्री शेडमध्ये शाळा भरविली. शिक्षकांची विद्यार्थीप्रती आत्मियता, ज्ञानार्जनाचा ध्यास, या बळावर शाळेने भरारी घेण्यास सुरूवात केली. 1995 मध्ये शाळेने चार एकर जागेत शाळा उभारली. तत्कालीन शिक्षणमंत्री अनंतराव थोपटे साहेब यांच्या मार्गदर्शनावर शाळेला उर्जितावस्था प्राप्त झाली. 1992 ते 1995 या वर्षांत आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू झाले. त्यानंतर 1996 ते 1998 या कालावधीत 5 वी ते 7 वीपर्यंत शाळा सुरू झाली. खानापूर परिसरात पालकांचा सहभाग शाळेसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. सात वर्षांत शाळेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. 1999 मध्ये विद्यालयाने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर कॉलेज सुरू केले. 2004 ते 2005 पासून कॉलेज अनुदानित झाले.
– शब्दांकन
भुजंगराव दाभाडे, (भोर तालुका प्रतिनिधी)