पुणे – महापालिकेकडून राज्यशासनाच्या आदेशानुसार, माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात आली असली तरी पालिकेसाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठ येथील उर्दू शाळेच्या शिक्षकास करोनाची लागण झाली असल्याचे गुरूवारी समोर आले.
दरम्यान, माध्यमिक विभागाचे सुमारे 230 शिक्षक असून या शिक्षकांच्या करोना चाचण्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखी शिक्षक बाधित सापडल्यास पालिकेच्या शाळा सुरू होण्यापूर्वीच बंद ठेवण्याची वेळ ओढावण्याची शक्यता आहे.
राज्यशासनाने येत्या सोमवारपासून 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेच्या शहरात 8 ते 12 वी पर्यंतच्या 43 शाळा असून 25 महापालिका व 18 खासगी संस्थाच्या माध्यमातून चालविल्या जातात. या शाळांमध्ये 9 ते 12 वीचे सुमारे 8671 विद्यार्थी आहेत. तर सुमारे 230 शिक्षक आहेत. शाळा सुरू होणार असल्याने महापालिका शाळांसाठी पालिकेने स्वतंत्र नियामवली केली असून त्यानुसार, शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.