मंडईतील वाहनतळाला कुलूप : माहिती नसल्याने नागरिकांची गैरसोय
जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने करणार वसुली
या ठेकेदाराकडून ही सर्व रक्कम सक्तीने वसूल करण्यात येणार आहे. संबंधिताची अनामत रक्कम महापालिकेकडे आहे. करारानुसार, ही रक्कम जप्त केली जाणार असून पैसे न भरल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेकेदाराच्या इतर मिळकतींवर पालिकेचा बोजा चढविण्यात येणार आहे. तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पुणे – महापालिकेची तब्बल 46 लाख रुपयांची थकबाकी ठेवल्याने मंडई येथील सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळाला मालमत्ता व्यवस्थापन विभागाने टाळे ठोकले आहे. हे वाहनतळ चालविण्यास दिलेल्या ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात येणार असून नवीन निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, हे वाहनतळ 8 ऑगस्ट रोजीच बंद केले असले, तरी त्याची माहिती नागरिकांना नसल्याने गैरसोय होत आहे. या पार्किंगची क्षमता सुमारे 246 चारचाकी वाहनांची आहे.
या कारवाईची माहिती उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली. महात्मा फुले मंडई तसेच परिसरात व्यापारी पेठा आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन दोन वाहनतळे विकसित करण्यात आलेली आहेत. त्यातील सतीशशेठ धोंडीबा मिसाळ वाहनतळ मंडईसमोर आहे. हे वाहनतळ चालविण्यास दिलेल्या ठेकेदाराने तब्बल 46 लाखांचे भाडे थकविले आहे. त्यामुळे प्रशासनाने नोटीसही बजावल्या होत्या. मात्र, थकबाकी भरली जात नसल्याने अखेर पालिकेने या पार्किंगला टाळे ठोकले, असे यावेळी सांगण्यात आले.