वाहतूक वाहनांना करामध्ये सूट

पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका वाहतुकीला बसला आहे. याच पार्श्‍वभूमीवर मागील काही महिन्यांपासून वाहतुकदारांकडून वाहन कर माफ करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीबाबत वाहतूकदारांना शासनाने दिलासा दिला आहे. नियमित करदात्यांना नव्या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून, परिवहन संवर्गांतील (प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या) काही वाहनांना सुमारे 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू झाले. यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. त्यामुळे वाहने 4-5 महिने एकाच जागी असल्याने वाहतुकदारांना मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर वाहनचालकांकडून करामध्ये सूट देण्याची मागणी करण्यात येत होती. हा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन होता. याबाबत सोमवारी अधिसूचना जाहीर केली.

राज्यात नोंदणीकृत झालेल्या, वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांचा कर 31 मार्च 2020 पर्यंत देणे अपेक्षित होते. अशा प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या (परिवहन) संवर्गांतील वाहनांना महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमांतर्गत 1 एप्रिल ते 31 मार्च 2021 या कालावधीत करामध्ये सूट देण्यात येणार आहे. परंतु, मागील वर्षाचा वार्षिक कराचा 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी भरणा केलेल्या नियमित करदात्यांना ही सूट मिळणार आहे.

वार्षिक कर भरणा करणारी मालवाहतूक वाहने, वार्षिक कर भरणारी पर्यटक वाहने, खनित्रे, खासगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅपर्स वाहने, शालेय विद्यार्थी वाहतूक बस या संवर्गांतील वाहनांना वार्षिक करात 50 टक्के सूट देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.