पुणे – आतापर्यंत कोणतीच प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना आता एमबीए प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. अशांना प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास त्यांना एमबीएला प्रवेश द्यावा, असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहेत. त्यामुळे इन्स्टिट्यूट व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सॅट, सी मॅट, आत्मा, मॅट, जीमॅट आदी परीक्षा घेतल्या जातात. मात्र, करोनामुळे काही राज्यांना एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे शक्य झाले नाही. सीईटी दिली नाही म्हणून विद्यार्थी प्रवेशापासून एमबीए व पीजीडीएम संस्थेमधील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, या उद्देशाने “एआयसीटीई’ने सीईटी परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेषत: पुण्यासारख्या मोठा शहरात एमबीए प्रवेशासाठी देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती असते. यंदा मात्र करोनामुळे एमबीए प्रवेशासाठी राज्यासह देशातील बहुतांश विद्यार्थी स्थानिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे यंदा एमबीएच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत “एआयसीटीई’ने एमबीएच्या जागा रिक्त राहिल्यास त्या जागेवर प्रवेश देण्याचे निर्देश दिल्याने शिक्षण क्षेत्रातून त्याचे स्वागत होत आहे.