Accident News – कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे भीषण रस्ता अपघात झाला असून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र.44 (श्रीनगर-कन्याकुमारी) चित्रावती वाहतूक पोलीस स्टेशनसमोर घडला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये 8 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. महामार्गावर वेगाने चाललेल्या टाटा सुमोने उभ्या असलेल्या टॅंकरला धडक दिली. दाट धुक्यामुळे कार चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला टॅंकर दिसला नाही आणि त्याची धडक बसली.
पोलिसांनी सांगितले की, हा अपघात सकाळी सातच्या सुमारास चिक्कबल्लापूर शहराच्या जिल्हा मुख्यालयाच्या हद्दीत घडला. एसयूव्ही आंध्र प्रदेशातील अनंतपूरहून बेंगळुरूला जात असताना चालकाने राष्ट्रीय महामार्ग-44 वर उभ्या असलेल्या टॅंकरला धडक दिली.
अपघातात ठार झालेले लोक हे अनंतपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतांमध्ये कार चालकाचाही समावेश आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे,
मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. सर्व मृत हे गोरंटला येथील रहिवासी असून ते एका कुटुंबातील नव्हते. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.