पुणे – शहरात ‘झिका’ विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, त्यावर उपाययोजनांची दिशा ठरवण्यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करणे आवश्यक आहे. महापालिकेने तातडीने टास्कफोर्सची निर्मिती करावी, अशी सूचना माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
करोनाची पार्श्वभूमी पाहता, यावर योग्यवेळी आवर घालणे आणि जागृती होणे आवश्यक आहे. येरवडा येथील प्रतीकनगर येथील 64 वर्षीय महिलेला झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बाधित भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. या संसर्गजन्य विषाणूसंदर्भात जागरूकता निर्माण होण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, असे मोहोळ यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने वेळीच हालचाली करण्याची आश्यकता आहे.