काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीने महिलांवरील निर्बंध अधिकच जाचक केले आहेत. संगीत आणि रेडिआ चॅनेलवरील महिलांच्या सहभागावर तालिबानकडून बंदी घालण्यात आली आहे. कंदहारमध्ये यासंदर्भातील फतवा जारी करण्यात आला आहे.
तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर लगेचच काही मीडिया हाऊसनी आपल्या वृत्तनिवेदक महिलांना कामावरून कमी केले आहे. काबूलमधीलही काही प्रसिद्धीमाध्यमांनीही आपल्या काही पत्रकार महिलांना काम थाबवून घरी परत जाण्यास सांगितले आहे.
15 ऑगस्टला देशाच सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर लगेचच तालिबानने 17 ऑगस्टला महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याची तयार दर्शवली होती. आपली कट्टरवादी प्रतिमा पुसून टाकण्याचाच हा प्रयत्न होता. विशेषतः तालिबानी राजवटीला घाबरून देश सोडून जाणाऱ्या शेकडो नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी तालिबानने असे सांगितले होते. मात्र आता तालिबानने आपला मूळ रंग दाखवायला सुरूवात केली आहे. आता अनेक महिलांना आपले दैनंदिन आयुष्यगी धोक्यात असल्याची जाणीव व्हायला लागली आहे.