दहिवडी -तोंडले (ता. माण) येथील तलाठी संजय मुळे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहिवडी येथे रंगेहात पकडले. याबाबत माहिती अशी, की तोंडले या तलाठी सजाचा कारभार संजय मुळे हे पाहत होते.
तेथील एका तक्रारदाराच्या सात बारावरती बोगस नोंद झालेले नाव कमी करुन, ते कमी झाल्याचा नवीन सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी मुळे यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याशी संपर्क साधून संबंधित तलाठ्यांनी लाचेची मागणी केल्याबद्दलची हकीकत सांगून, कारवाई करण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहिवडी येथे सापळा रुचून संजय मुळे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस हवालदार नितीन गोगावले, पोलीस नाईक निलेश राजपुरे यांनी केली.