कोहलीकडून नेतृत्व काढावे – गंभीर

नवी दिल्ली – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने यंदाच्या स्पर्धेतही निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांच्या संघाचा खेळ पाहिला तर सांघिक भावनाच दिसत नाही व त्यासाठी कर्णधार विराट कोहलीच जबाबदार आहे. आता त्याच्याकडून नेतृत्व काढून घेतले गेले पाहिजे, असे स्पष्ट मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.

जर संघाच्या विजयासाठी कर्णधाराचे कौतुक केले जाते तर मग पराभवाची नैतिक जबाबदारीही त्याचीच राहते. आता कोहलीपेक्षा अन्य कोणाचा कर्णधारपदासाठी विचार करण्याची वेळ आली आहे. कोहलीची वैयक्तिक कामगिरी तर सुमारच झाली, पण संघालाही तो दिशा दाखवू शकला नाही. हेच चित्र आणखी किती वर्षे दिसणार, असा सवालही त्याने केला.

जो सामना जिंकणे प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी महत्त्वाचे होते, त्या सामन्यात बेंगळुरूला केवळ 132 धावाच करता आल्या. त्यातही डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतरही कोहलीच्या संघाला हैदराबादवर दडपण राखण्यात यश आले नाही. यात एक कर्णधार म्हणून कोहलीचे अस्तित्वच दिसून आलेले नाही. त्यामुळे आता त्याला केवळ एक फलंदाज म्हणूनच संघात ठेवत नेतृत्वाची जबाबदारी अन्य खेळाडूकडे सोपवली गेली पाहिजे, असेही गंभीर म्हणाला.

बंगळुरू संघाच्या व्यवस्थापनात मी असतो व मला निर्णयाचा हक्‍क असता तर कोहलीकडून नेतृत्व आता याच क्षणी काढून घेतले असते. गेली आठ वर्षे कोहलीकडे नेतृत्व आहे व त्यात एकदाही बेंगळुरूला विजेतेपद पटकावता आलेले नाही. याचा विचार झालाच पाहिजे. मी कोहलीचा शत्रू नाही, असेही त्याने सांगितले.

रविचंद्रन अश्‍विनच्या बाबतीत जे घडले तेच कोहलीबाबतही घडले पाहिजे. किंग्ज इलेव्हन पंजाबची सुमार कामगिली झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी अश्‍विनकडून नेतृत्व काढून घेतले गेले होते. मुंबई इंडियन्सने चार वेळा तर चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा विजेतेपद मिळवले म्हणूनच रोहित शर्मा व महेंद्रसिंग धोनी यांनी या संघांचे प्रदीर्घ काळ नेतृत्व केले आहे. स्वतःसह संघालाही सिद्ध केले असते तर कोहलीचे समर्थन केले असते, असेही गंभीरने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.