महापौर मुरलीधर मोहोळ यांची पुणे पोलिसांना विनंती
शहराच्या पूर्व भागात होणार कठोर अंमलबजावणी
पुणे – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सील करण्यात आलेल्या भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग आणि ढोले पाटील रोड या तिन्ही क्षेत्रीय कार्यालय परिसरात रुग्णांची संख्या वाढतच असून, याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना दिल्या आहेत. याबाबत मोहोळ यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चाही केली आहे.
अचानक वाढलेल्या बाधितांच्या संख्येमुळे शहराचा पूर्व भाग सहा एप्रिल रोजी सील करण्यात आला होता. त्यासाठी करोनाबाधितांच्या डिजिटल मॅपिंगचा अभ्यास केला आणि त्याद्वारे बाधीत परिसर सील करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. त्यामुळे शहराच्या इतर भागांत करोनाचा होणारा प्रसार आणि संसर्ग रोखण्यात आपल्याला तूर्त तरी यश आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते आहे. मात्र, सील केलेल्या भागातील बाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी तातडीने कठोर पावले उचलण्याची सूचना पुणे पोलिसांना केली आहे. यावेळी पोलीस सह-आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे हेही उपस्थित होते.
13 एप्रिलपर्यंतची आकडेवारी पाहिली, तरी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 78 रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयार्तगत 41 तर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयार्तगत 39 रुग्ण आहेत. याचा विचार केला तर शहरातील एकूण 286 रुग्णांपैकी 158 हे शहराच्या मध्यवस्तीतील या तीन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येतात. शिवाय वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, हडपसर-मुंढवा आणि धनकवडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 65 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहराच्या सात क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 223 रुग्ण आढळले आहेत, असे मोहोळ यांनी सांगितले.
बाधित परिसर सील केले असले तरी या ठिकाणी रुग्ण संख्या आटोक्यात येणे आवश्यक बनले आहे. नागरिकांकडून परिणामकारक सोशल डिस्टंन्सिग आणि लॉकडाउनची अंमलबजावणी होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी आवश्यक ती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कठोर पावले उचलताना महापालिकेकडून पोलिसांच्या सूचनेनुसार आवश्यक ती मदत पुरवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर भूमिका घेणे आवश्यक बनले आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे