शेवगाव -छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 14) रात्री निघालेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या, तसेच, वाहने व दुकानाच्या तोडफोडीच्या प्रकरणातील राहिलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, तसेच ही बाब पोलिस यंत्रणेने गांभीर्याने घ्यावी, अशा सूचना नाशिक परिक्षेत्रचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी येथे दिल्या.
शेवगावात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी काल (गुरुवार) रात्री शेवगाव येथे भेट देऊन या घटनेची सर्वांगीण माहिती घेतली. आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेऊन पुढील तपासाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या वेळी त्यांनी क्रांती चौक, शिवाजी चौक, जैन गल्ली, मारवाड गल्ली, खंडोबा नगर, आखेगाव रस्ता आदी दंगलग्रस्त परिसराची पायी जाऊन पाहणी केली.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, रवींद्र बागूल, आशिष शेळके, गुप्त वार्ताचे धाकतोडे उपस्थित होते.
डीजे व मिरवणुकांना बंदी
या प्रसंगी तातडीने दखल घेऊन पुढील अनर्थ टाळल्याबद्दल महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी स्थानिक पोलिसांचे कौतुक केले. मात्र, येथून पुढे कोणत्याही कार्यक्रमास डीजे लावण्यास व मिरवणुका काढण्यास बंदी घालण्याचे आदेश देखील दिले.