चार वर्षांनी रद्द झाला प्रेमविवाह : खोटी माहिती सांगून अडकवले होते जाळ्यात
न्यायालयाच्या आदेशाने मोठा दिलासा : विवाहनंतर काही महिन्यांतच झाला भांडाफोड
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – ती अभियांत्रिकी शिकणारी तरुणी…कॉमन फ्रेंडमुळे त्याची आणि तिची ओळख झाली… त्याने “वडील पोलीस उपअधीक्षक, आई उपजिल्हाधिकारी, मी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे,’ असे भासवले…प्रेमाच्या आणाभाका घेतल्या…तीदेखील भूलथापांना बळी पडत जाळ्यात अडकली…आंधळेपणाने तिने आंतरजातीय विवाह केला. मात्र, काही दिवसांतच धक्कादायक सत्य उघड झाले. यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, न डगमगता तिने न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आणि तब्बल चार वर्षांच्या संघर्षानंतर तिला यश मिळाले. फसवणूक करून झालेला प्रेमविवाह न्यायालयाने रद्द केला.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवीच्या वतीने ऍड. प्रशांत वाटविसावे आणि ऍड. स्वप्नील यादव यांनी न्यायालयात बाजू मांडली. संबंधित तरुणी पुण्यात शिक्षण घेत आहे. एमपीएससी तयारी करणाऱ्या युवकासोबत तिची मैत्री होती. तेथेच कुठेतरी तो होता. कॉमन फ्रेंडमुळे दोघांची ओळख झाली.
त्यानंतर त्याने तिच्याशी ओळख वाढवली. भूलथापा देत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी जुलै 2014 आळंदी येथे लग्न केले. त्यानंतर आपण यूपीएससी पास झालो असून, लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर तिने यूपीएससी उमेदवारांची यादी बघितली. त्यात त्याचे नावच नव्हते. तिला धक्काच बसला. याबाबत पोलिसांत तक्रारही दिली. त्यानंतर तिने अधिक चौकशी केली, त्यावेळी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई घरकाम करते. तो बॅंकेत किरकोळ पदावर कामावर असल्याचे पुढे आणले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने थेट सप्टेंबर 2015 मध्ये खेड न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती.
प्रेम अथवा ऍरेंज विवाहाच्या वेळी अनेकदा शिक्षण, नोकरी, पगार, कौटुंबिक परिस्थितीबाबत खोटी आणि चुकीची माहिती सांगितली जाण्याची शक्यता असते. खरी माहिती लपविली जाते. त्यामुळे अनेकांची फसवणूक होते. त्यामुळे पश्चातापाची वेळ येते. आयुष्यं उद्ध्वस्त होतात. त्यामुळे पूर्ण आणि खात्रिशीर माहिती मिळाल्याशिवाय विवाह जमवू नये. विशेषत: प्रेमविवाह करताना समोरच्या व्यक्तीची वैयक्तिक, कौटुंबिक पार्श्वभूमी तपासून घेणे आवश्यक आहे.
– ऍड. प्रशांत वाटविसावे, कार्यकारिणी सदस्य, पुणे बार असोसिएशन.