अतिस्वच्छतेमुळे योनीमार्ग कोरडा पडतो आणि मग तिथली प्रतिकारक्षमता कमी होते. परिणामी वेगवेगळी इन्फेकशन्स व्हायला सुरवात होते. चला तर मग याबाबतीतील योग्य आणि अयोग्य गोष्टी बघू.
१. असं म्हंटलं जात की योनीमार्ग स्वतःला बऱ्यापैकी स्वच्छ ठेवू शकतो. अंघोळीच्या वेळी साध्या पाण्याने धुणे पुरेसे आहे.त्या भागात साबण बिलकुल वापरू नये. योनीमार्गाचा PH असिडीक असतो आणि साबण अल्कली असतो त्यामुळे साबण टाळावा.
रात्री हवं तर एकदा वॉश घ्या.त्यापलीकडे सारखे धुणे,हँड शॉवर वापरणे, सारखे पुसणे अजिबात नको. हँड शॉवर च्या फवाऱ्यामुळे योनीमार्गातील ग्रंथी उत्तेजित होऊन पांढरा स्त्राव जास्त जाऊ शकतो. तसेच टॉयलेट पेपर ने जास्त जोरात पुसल्यामुळे कोरडेपणा आणि चांगल्या जीवजंतूंचा समन्वय बिघडू शकतो.
२. योनीमार्गाच्या जवळ कोणत्याही प्रकारची पावडर कधीही वापरू नका. टाल्कम पावडर योनीमार्गात जाऊन अंडाशय म्हणजे ओवरीचा कॅन्सर होऊ शकतो असे निदर्शनास आले आहे. मांड्यांना पावडर लावायची असेल तर आधी अंडरवेअर घालून मग पावडर लावा.
३. थोडे पांढरे जाणे नैसर्गिक आहे. जास्त जात असेल किंवा त्यात खाज, जळजळ, वास असेल तर लगेच स्त्रीरोगतज्ञांना दाखवणे आवश्यक आहे. कृपा करून मनाने, अथवा केमिस्टच्या सल्ल्याने अथवा जाहिराती बघून क्रीम्स आणून वापरू नका. स्टिरॉइड असलेल्या अशा क्रीम्स मुळे आम्ही आजकाल कोणत्यात औषधांना दाद न देणारी अतिशय चिवट इन्फेकशन्स बघत आहोत. त्यामुळे ‘निम हकीम और खतरेमे जान’ असं करू नका.
४. योनीमार्गाजवळचे केस ही खूप जणींना अवघड समस्या वाटते. हे केस काही प्रमाणात या भागाच्या सुरक्षेसाठी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्ण शेव करणे चुकीचे आहे. त्यामुळे केसांची मुळे उघडी पडून इन्फेक्शन होऊन फोड येऊ शकतात तसंच परत केस वाढायला लागले की खाज सुटते. हेअर रेमुविंग क्रीम या भागात वापरणे अतिशय धोक्याचे आहे. तशी पॅक वर सूचना पण असते. केमिकल रिऍकशन येऊ शकते. सर्वात उत्तम म्हणजे कात्रीने हे केस छोटे ठेवणे. त्यामुळे स्वच्छता ठेवणे पण सोपे जाते. कात्री वापरताना मात्र जर जपून..
५. कित्येक स्त्रिया पाळीची तारीख जवळ आली की पॅड लावायला सुरवात करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे हमखास रॅश येते आणि सॅनिटरी पॅड मध्ये dioxin नावाचे केमिकल असतं त्याचा संबंध योनीमार्गाशी कारण नसताना जास्त येतो. पॅड जवळ ठेवून गरज लागेल तेव्हाच वापरावे. घरगुती पॅड वापरण्यात जंतुसंसर्गाचा धोका संभवतो.
६. अतिस्वच्छतेमुळे होणाऱ्या समस्या आपण बघितल्या त्याप्रमाणेच अस्वच्छतेमुळे ही समस्या येतातच. अंघोळीच्या वेळी योनीमार्ग स्वच्छ न करणे, तिथले केस वेळीच न कापणे, सॅनिटरी पॅड वेळेवर न बदलणे, ओली अंतर्वस्त्रे वापरणे या सगळ्या गोष्टी टाळायलाच हव्यात. लैंगिक संबंधानंतर वॉश घेणे योग्य आहे.
७. योनीमार्गाच्या भागात सेंट, परफ्युम्स, डिओडरंट्स वापरणे शक्यतो टाळावे. थेट त्वचेवर या गोष्टी वापरण्यापेक्षा कपड्यांवर मारावे. ते जास्त सुरक्षित आणि रिऍकशन ची शक्यता कमी.
८. अंतर्वस्त्रे कायम कॉटन चीच असावीत. नवी घेतल्यावर धुवून वापरावीत आणि धुताना साबण किंवा डीटरजंटचे अंश राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. साबणाचा अंश राहिल्यास त्रास होऊ शकतो.