निमोणे – शिरूर तालुक्यातील पूर्व भागात मोटेवाडी, करडे, लंघेवाडी, चव्हाणवाडी, निमोणे, शिंदोडी, गुनाट, चिंचणी आदी गावांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने ऊस पडला असून काही ठिकाणी बांध फुटले आहेत.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. रविवार (दि. 31) रात्री न्हावरे, निमोणे, गुनाट, शिंदोडी परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर मंगळवार (दि. 2) न्हावरे, आंबळे, करडे, निमोणे परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ऊस मोठ्या प्रमाणात पडला आहे. बांधही पाण्याच्या वेगाने फुटले आहेत. अनेक वर्षांत वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगाम चांगला जाण्याची चिन्हे आहेत.