नवी दिल्ली: देशभरातील ज्या भागामध्ये करोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत तेथे एँटिबॉडी टेस्ट (रक्ताची चाचणी) करण्याची सूचना इंडियन कॉंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने केली आहे. या निर्णयामुळे करोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण वेगाने ओळखणे शक्य होईल, असे नमुद केले आहे.
सध्या करोना विषाणूची चाचणी करण्यासाठी पीसीआर पद्धती वापरली जाते. यामध्ये संशयित रुग्णाच्या घशातील स्वॉब घेतले जातात. या चाचणीचे निकाल येण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. सध्या केवळ ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची आणि करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची पीसीआर चाचणी केली जात आहे.
एँटिबॉडी चाचणीमुळे ज्या रुग्णांना करोना विषाणूची लागण झाली आहे, त्यांना शोधणे शक्य होईल. विशेषतः ज्या रुग्णांमध्ये अजिबात लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, त्यांना शोधणे यामुळे शक्य होईल. यामुळे कोणत्या नागरिकांनी करोनाचा प्रभावीपणे मुकाबला केला आहे, हे सुद्धा स्पष्ट होईल.
एँटिबॉडी तपासणीचा निकाल येण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. जिथे रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहेत. तिथे रॅपिड एंटिबॉडी टेस्ट केली जावी. जे रुग्ण या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळतील. त्यांची पीसीआर चाचणी घेतली जावी. जे रुग्ण निगेटिव्ह आढळतील. त्यांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जाव्यात, असे आयसीएमआरच्या निवेदनात म्हटले आहे.
एँटिबॉडी टेस्टचा अर्थ काय?
एँटिबॉडी टेस्टमध्ये संशयित रुग्णाच्या रक्ताचे काही थेंब घेतले जातात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याचा अर्थ संबंधित रुग्णामध्ये करोना विषाणूच्या एँटिबॉडीज आहेत. याचाच अर्थ त्याला आधी हा आजार झाला होता आणि तो आजारातून बरा झाला आहे. कोणत्याही बाह्य विषाणूपासून शरीराचे रक्षण केल्यानंतर एँटिबॉडीज तयार होत असतात.