पुणे – पुणे वनविभागाने कडबनवाडी ता. इंदापूर आणि शिर्सुफळ ता. बारामती येथे गवताळ सफारी पर्यटकांसाठी खुली केली आहे. गेल्या 20 दिवसांत येथे 30 बुकिंग मिळाले आणि 120 हून अधिक नागरिकांनी या सफारीला भेट दिली.
बारामती आणि इंदापूर परिसरातील सफारीचा हा भाग मृग, चिंकारा, ससा, लांडगा, कोल्हाळ आणि हायना यांसह शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांचे घरच आहे.
या परिसरात अनेक पक्षीही वास्तव्यास असतात. त्याची क्षमता लक्षात घेऊन पुणे वनविभागाने दोन वेगवेगळ्या भागात गवताळ सफारीसाठी संधी दिली आहे. ही सफारी दि. 18 ऑक्टोबरपासून पाहण्यासाठी खुली करण्यात आली, असे सहायक वनसंरक्षक आणि गवताळ सफारीचे प्रकल्प प्रभारी मयूर बोठे यांनी सांगितले.
“सध्या पर्यटक स्वत:च्या वाहनातून या सफारीला भेट देत आहेत. विभाग सफारीसाठी स्वतंत्र वाहनांचा विचार करू शकतो; परंतु आम्हाला अजून काही वेळ प्रतिसाद पाहावा लागेल. आगामी काळात पर्यटक संख्या वाढेल, कारण हिवाळा हा गवताळ प्रदेशाला भेट देण्यासाठी चांगला हंगाम आहे आणि वन्य प्राणी नियमितपणे पाहता येतात,’ असे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या गवताळ सफारीशिवाय पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये बिबट्या सफारी आणि बारामतीमध्ये वन्यजीव सफारीसह आणखी दोन सफारी प्रकल्पांची प्रतीक्षा आहे.
सफारी प्रकल्पाचा उद्देश !
– नागरिकांना गवताळ प्रदेशाच्या परिसंस्थेबद्दल जागरूक करणे
– गवताळ प्रदेशाच्या आसपास राहणाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे
– नागरिकांना विविध पक्षी, प्राणी निरीक्षणाची संधी देणे
वन्यजीव संरक्षण आणि गवताळ प्रदेश व्यवस्थापन उपक्रमात सहभागी असलेल्या स्थानिक नागरिकांसाठी मार्गदर्शक आणि पर्यटन व्यवस्थापनासोबतच वन्यजीव बचावाचे प्रशिक्षणही दिले जाईल.
– महादेव मोहिते, उप वनसंरक्षक, पुणे वनविभाग