संपर्क माध्यमांनी सामाजिक गरजांशी एकरूप व्हावे
पुणे – सामाजिक बदल आणि विकास यांचे एक साधन बनू शकल्यासच टेलिव्हिजन आणि इतर संपर्क माध्यमे आपल्यावरील गुंतवणूक समर्थनीय म्हणू शकतील. याकरिता सामाजिक गरजांशी त्यांनी एकरूप झाले पाहिजे, असे उद्गार केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री गुजराल यांनी येथे काढले. फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या “भारतातील टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या विकासात संशोधनाची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.
उंदीर संहारक मोहीम
लातूर – रब्बीच्या पिकास होणाऱ्या उंदरांच्या उपद्रवाच्या संहाराकरता शेतकऱ्यांना झिंक फॉस्फेट व सल्फासच्या गोळ्या मोफत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
कृत्रिम पूर, वादळ, दुष्काळ निर्माण करणारी शस्त्रे
न्यूयॉर्क – अमेरिकन लष्करी गट नवी हवामान नियंत्रक शस्त्रे शोधून काढीत आहे. त्यायोगे कृत्रिम पूर, दुष्काळ, सागरी तुफान-वादळे या गोष्टी घडवून आणता येतील. ही शस्त्रे शोधून काढण्यासाठी अमेरिकन सरकारने 20 लाख डॉलर मंजूर केले आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग अमेरिकन लष्कराने दक्षिण व्हिएतनामच्या लढाईत करून पाहिले. या शस्त्रास्त्रामुळे शत्रूचे पूल, रस्ते, कृत्रिम पूल उडवून लावणे शक्य व्हावे हा हेतू त्या संशोधकाचा होता.
बाटलीचे दूध अर्भकांना घातक
लंडन – विकसनशील राष्ट्रांतील गरीब स्त्रियांना आपल्या मुलांना पावडरचे दूध पाजावे लागते. परंतु त्यांचे जवळ बाटल्यांतील दूध जंतुरहित करण्याचे तंत्र व सोयी उपलब्ध नसतात. त्यामुळे कृत्रिम दुधामुळे अर्भकांची हत्या होण्याचा धोका असतो.