पुणे – करोनाचा नवा अवतार असलेल्या “ओमायक्रॉन’वरही प्रतिबंधात्मक लस निर्मितीचे काम सुरू आहे. पुण्यातील “जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स’ कडून ही लस विकसित करण्यात येत आहे. “एम-आरएनए’ तंत्रावर आधारित या लसीची मानवी चाचणी लवकरच सुरू होईल. यामध्ये तिची परिणामकारकता आणि प्रतिकारक्षमता तपासली जाणार असून, त्यानंतरच त्याच्या वितरणाला परवानगी देण्यात येईल.
सध्या आढळणाऱ्यांपैकी 85 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. तर, याआधीच्या लसी या करोनाचा मूळ विषाणू आणि डेल्टा आणि त्याच्या उपप्रकारावर प्रभावी आहेत. मात्र, अडीच महिन्यांपूर्वी आलेल्या “ओमायक्रॉन’ने संसर्गाचे आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले. हा सर्वाधिक वेगाने संसर्गित होणारा स्ट्रेन ठरला आहे. तो डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असला, तरी संसर्गक्षमता जास्त असल्याने अनेकजण वेगाने बाधित होत आहेत. त्यामुळे त्यावर लस तयार करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने “जिनोव्हा फार्मास्युटिकल’ कंपनी हे प्रयत्न करत आहे.
ही कंपनी करोनाच्या डेल्टा विषाणूवर प्रभावी असलेल्या दोन डोसची “एम-आरएनए’ या तंत्रावर आधारित लस विकसित करत आहे. या लसीचा तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तर या कंपनीने याआधी या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी 3 हजार स्वयंसेवकांवर पूर्ण करून तिचा डेटा केंद्राकडे सादर केला आहे. तर, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही सुरू आहे. त्यांना एकदा केंद्राकडून परवानगी मिळाल्यावर ती लस कंपनी बाजारात आणार आहे.
तसेच कंपनीने या लसीचे उत्पादनही सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा बूस्टर डोस हा ओमायक्रॉनच्या अँटिबॉडी निष्क्रिय करतो असा दावा केला आहे. परंतू, याबाबतचा डाटा हा लसीकरण नियमक विभागाकडून अद्याप पडताळणी व्हायचा आहे.
तर, जगभरात मॉडर्ना, सिनोफार्म, गमेलिया, नोवोवॅक्स, ऍस्ट्रेझेनेका या कंपन्यांकडूनही त्यांची ओमायक्रॉनवरील परिणामकारकता तपासण्यात येत आहे. तर फायजरने येत्या मार्चमध्ये त्यांची “एम-आरएनए’ तंत्रावर आधारित लस बाजारात येईल, अशी घोषणा केली आहे.