सिडनी – ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानने पावसाने व्यत्यय आणलेल्या लढतीत डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे 33 धावांनी पराभव केला. 1992 सालापासून जागतिक क्रिकेटमधील मोठ्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला सातत्याने पावसाचा फटका बसलेला आहे व हीच परंपरा या स्पर्धेतील या सामन्यातही कायम राहिली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या डावाती सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर कर्णधार आझम व महंमद रिझवान यांच्यासह शान मसुद यांनी साफ निराशा केली. त्यावेळी एका बाजूने तडफदार खेळत असलेला महंमद हॅरीस 11 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांसह 28 धावांवर परतला. त्यावेळी पाकिस्तानची अवस्था 4 बाद 43 अशी बिकट बनली होती. मात्र, इफ्तेकार अहमदने 51 तर शादाब खानने 52 धावांची खेळी केली. त्यांना महंमद नवाजने 28 धावा करत सुरेख साथ केली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकांत 9 बाद 185 अशी मोठी धावसंख्या उभारली.
नवाजने 22 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 28 धावांची खेळी केली. इफ्तेकारने आपल्या अर्धशतकी खेळीत 35 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार फटकावले. शादाबने 52 धावांची खेळी करताना 22 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकार अशी आतषबाजी केली. दक्षिण आफ्रिकेकडून अनरीच नोर्जेने सर्वाधिक 4 गडी बाद केले.
Pakistan keep semi-final hopes alive, clinching a win in the Group 2 clash against South Africa 🌟#T20WorldCup | #PAKvSA | 📝: https://t.co/kNNAHOmH9p pic.twitter.com/MI7dlmh8q2
— T20 World Cup (@T20WorldCup) November 3, 2022
विजयासाठी 186 धावांचे आव्हान घेत मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवातही अपयशी झाली. यंदाच्या स्पर्धेत भरात असलेले क्वांटन डीकॉक व रेली रोसो साफ अपयशी ठरले. त्यावेळी त्यांची स्थिती 2 बाद 16 अशी बनली होती. कर्णधार टेम्बा बवुमाने 19 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 36 तर एडन मार्करमने 14 चेंडूत 4 चौकार फटकावताना 20 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आधी बवुमा तर नंचर मार्करम बाद झाला. त्यावेळी त्यांच्या 9 षटकांत 4 बाद 66 धावा अशी स्थिती होती. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवावा लागला.
#T20WorldCup : झिम्बाब्वेवरील विजयानंतरही नेदरलॅंडचे आव्हान संपुष्टात
काहीवेळाने पाऊस थांबला व सामना सुरु झाला. त्यावेळी डकवर्थ-लुईस कोष्टकानूसार हा सामना 14 षटकांचा होणार असल्याचे पंचांनी जाहीर केले. दक्षिण आफ्रिकेसमोर 5 षटकांत 73 धावा करण्याचे आव्हान ठेवले गेले. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवले नाही व त्यांचा डाव 14 षटकांत 9 बाद 108 असा रोखला गेला व पाकिस्तानने 33 धावांनी हा सामना जिंकला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रीदीने 3 तर, शादाब खानने फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवताना 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान – 20 षटकांत 9 बाद 185 धावा. (शादाब खान 52, इफ्तेकार अहमद 51, महंमद नवाज 28, महंमद हॅरीस 28, अनरीच नोर्जे 4-41).
दक्षिण आफ्रिका – 14 षटकांत 9 बाद 108 धावा. (टेम्बा बवुमा 36, एडन मार्करम 20, ट्रीस्टन स्टब्स 18, हेनरीच क्लासेन 15, शाहीन आफ्रिदी 3-14, शादाब खान 2-16).