बारामती (जळोची प्रतिनिधी) – शहरातील भिगवण रस्त्यावर रिलायन्स पेट्रोलपंपानजीक सायंकाळच्या सुमारास युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आकाश सुभाष जाधव (वय ३०) असे युवकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे.
गुरुवारी(दि. ३) भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर हा प्रकार घडला आहे. सायंकाळी हा प्रकार घडला आहे. पोलीसांनी याबाबत अ्द्याप तपास सुरु असुन गोळीबार झाल्याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. तपासानंतरच गोळीबारा बाबत सांगणे योग्य ठरेल,अशी सावध भूमिका पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.
शहरातील युवकांच्या दोन गटात भांडणे झाली. यामध्ये आकाश सुभाष जाधव (वय ३०) या युवकावर सायंकाळी ६ वाजता गोळी झाडण्यात आली. तसेच जाधव हे पत्रकार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
गोळीबारात तांदुळवाडी येथील युवक जखमी झाल्याची चर्चा आहे. मात्र,भांडणाच्या कारणाबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. दुचाकीवरुन आलेल्या काहींनी हा गोळीबार केल्याचे समजते.
जखमी युवकाला बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत डॉ. दिपक महाडीक यांनी बोलताना सांगितले कि, जाधव यांच्या छातीला डाव्या बाजुला लागली आहे. ती गोळी किडनीला जखम होवुन ती गोळी मणक्यामध्ये अडकली आहे. सध्या युवकाची प्रकृती स्थिर असून उपचार चालू असल्याचे देखील डॉ. महाडीक यांनी सांगितले आहे.