एसटी कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची टांगती तलवार

पुणे – ऐन दिवाळीत प्रशासनाविरोधात केलेली निदर्शने एसटी कर्मचाऱ्यांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. मुंबईसह राज्यातील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर आठ दिवसांत उत्तर न दिल्यास दिवाळी भेट आणि एका दिवसाचा पगार अशी एकूण रक्कम पगारातून कापण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.

दिवाळीसाठी 12,500 रुपये उचल देण्याच्या मागणीसह, नादुरुस्त वाहने, नादुरुस्त तिकीट मशीन अशा एकूण 20 मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत निदर्शने केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. दिवाळी भेट देऊनही निदर्शने करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना महामंडळाने नोटीस बजावली आहे.

या निदर्शना अंतर्गत कर्मचाऱ्यांनी अधिकृतपणे पत्र देऊन जेवणाच्या सुट्टीत केवळ घोषणाबाजी केली होती. त्यामुळे दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावरदेखील त्याचा परिणाम झालेला नाही. कर्मचाऱ्यांची वेतनकपात केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
– हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Leave A Reply

Your email address will not be published.