#प्रभात_दीपोत्सव_२०२० : आठवणींचे झुले

– मानसी चिटणीस


कधी कधी ना, वळवाच्या पावसासारखे अचानक आठवणींचे कप्पे रिकामे होऊ लागतात आणि मग आपली धांदल उडते त्या आठवणींच्या चिमण्या गोळा करण्याची… प्राजक्‍ताच्या गंधाळ सड्यासारख्या या आठवणी असतात. आपण कसे त्यातले एखादे फुल पटकन उचलून ओंजळीत घेतो आणि त्याचा गंध श्‍वास भरून घेतो ना तसेच काहीसे या आठवणींचे असते. प्रत्येक आठवणीचा गंध वेगळा, तिची अनुभूती वेगळी, तिचा लहेजा वेगळा. त्यात त्या आठवणी बालपणीच्या असतील तर सोने पे सुहागा. 

या बालपणीच्या आठवणी अनेक वलयं रचतात जगण्याची. या आठवणींच्या आधारे पुढे आयुष्य रंगत जातं. लहानपण हे एक शिल्प असतं स्वप्नांचं. जे पुढे दिशा देत जातात आपल्याला. जगण्याच्या लढाईत जेव्हा आपण थकतो, ढासळतो, मावळत राहतो तेव्हा या बालपणीच्या आठवणी, त्यात गुंफलेली माणसं, प्रसंग आपल्याला पुन्हा उभारी देतात. हे लहानपणच असतं जे आपला निरागस चेहरा जपून ठेवतं आणि धीर देतं पुढे चालण्यासाठी. या बालपणीच्या आठवणी खजिन्याच्या गुप्त पेटीसारख्या असतात. परिकथेसारख्या एकाहून एक अशा सुरस आठवणी या पेटीत लपलेल्या असतात.

 एखादे उतरंडीतले गुपित असावं ना! तशा जपलेल्या असतात. या आठवांचे आवर्त कधी नकळत उमलून येतात अन्‌ मन रंगत जातं त्यांची लिंपणपुटे चढवून. आकाशातले ढग निरनिराळ्या आकारांचे असतात. कधी कधी वेगवेगळे रंग पांघरतात तसेच काहिसे या लहानपणीच्या आठवणींचे असते. माझ्या या आठवणीही सिंदबादच्या सफरीसारख्या मनात तरळत राहतात. माझे बालपणही होतेच तसे एखाद्या गोष्टीत घडल्यासारखे… 

खंडोबाचा सातारा; औरंगाबाद जिल्ह्यातले एक शेतीमातीचे गाव; जिथे माझे बालपण रमले. गावाच्या मध्यभागी माझ्या मामाचा तीन चौकी वाडा होता. पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांच्या इतिहासाचा वारसा सांगणारे सारे ऐवज वाड्यात जपले होते आणि वाड्यासमोर खंडोबाचे प्राचीन देवालय. गावाच्या कडेने शिवाराचे लेणे आणि एका बाजूला पहारा देणारा जागल्या असतो ना, तसा उभा खंडोबाचा डोंगर. आजही डोळ्यांसमोर जसेच्या तसे चित्र उभे राहते. सकाळच मुळी व्हायची ती वासुदेव आणि वाघ्याच्या आरोळीने. मोरपिसांची टोपी घातलेला वासुदेव अन्‌ अंगावर वाघाचं कातडं पांघरून भंडारा उधळत येणारा वाघ्या. मी त्या वाघ्याला फार घाबरायचे.

तो येताना दिसला की देवडीवरच्या कोनाड्यात लपून बसायचे. त्यालाही ते माहिती असायचं बहुतेक. तो हसायचा अन्‌ जय मल्हारी असं म्हणून देवडीच्या दिशेने एक भंडाऱ्याची मूठ उधळायचा. त्या भंडाऱ्याचे कण उन्हाच्या कोवळ्या कवडशात मिसळायचे. तेव्हा ऊन आणि भंडारा दोन्ही सोनेरी दिसायचे. मी ते सोन्याचे कण पकडायला धावायचे. तोवर मामीने चौकात, अंगणात शेणसडा टाकलेला असायचा. त्यावर कधी पानाफुलांची तर कधी ठिपक्‍यांची रांगोळी सजलेली असायची. मला रांगोळी काढू दिली नाही म्हणून मी फुरगंटले की आजी जवळ घ्यायची आणि परसदारी देवांसाठी फुलं तोडायला घेऊन जायची. देवपूजेसाठी भारी मान होता या फुलांना. काशीविश्‍वेश्‍वरासाठी पांढरी फुलं, गजाननासाठी हजारी जास्वंद, अन्नपूर्णेसाठी मोगरा अन्‌ बाळकृष्णासाठी तुळस. सारा देव्हारा सुगंधानं भरून जायचा.

आम्ही फुलं घेऊन येईपर्यंत मामाने गाईंच्या धारा काढलेल्या असायच्या. त्या धारोष्ण दुधाची चव अजूनही ओठांवर रेंगाळते. दूध प्यायल्यावर माझ्या आंघोळीचा मोठा कार्यक्रम असायचा; कारण माझा आंघोळीचा कंटाळा! मग आजी धरून ठेवायची अन्‌ मामी आंघोळ घालायची. सुरुवातीला अगदी नक्‍को नक्‍को वाटायचं, पण पाण्याशी उबदार सलगी झाली की मस्त मोकळं वाटायचं. खंडोबाच्या आरतीसाठी घंटा वाजायला लागल्या की, पळत सुटायचं मंदिराच्या दिशेने; सर्वात आधी कोण पोचतो याची शर्यत लागायची. मंदिरातल्या नगारखान्यात जाऊन त्याच्या मागच्या लिंबोणीखालच्या खंडोबाची आरती आधी पहायची अन्‌ पुन्हा धावत मुख्य मंदिरात यायचं. प्रभूकाकानं खंडोबाला स्वच्छ आंघोळ घातलेली असायची. 

अंगावर रेशमी कपडे, कंगणीदार पगडी, भंडाऱ्याचा मळवट भरलेला काळ्याभोर डोळ्यांचा तो देव एकदम निरागस दिसायचा. शेजारीच त्याची भलीथोरली तलवार आणि पितळी घोड्यावरची मूर्ती असायची. ती मूर्ती चमकायची मधूनच. यळकोट यळकोट जय मल्हार…चा जयघोष झाला की, आरतीला सुरुवात व्हायची. घंटा झांज यांचे आवाज प्रभूकाकाच्या आवाजात मिसळले जायचे. मी डोळे मिटून ऐकायचे तो आवाज. शिखरावरचा झेंडाही फडकत आरतीमध्ये साथीला असायचा. 

आरतीनंतर खोबरं आणि रेवड्यांची देवावर उधळण व्हायची. त्या रेवड्या गोळा करण्यासाठी आम्हा मुलांची झुंबड उडायची अगदी. ज्याच्याकडे जास्त रेवड्या तो राजा! साधे गणित होते अगदी. आरतीनंतर मंदिरातच ताक-तुंब्याचा खेळ रंगायचा. कधीकधी जोडीला लपाछपीही असायची. मनभर खेळून झालं की पोटातले कावळे जागे व्हायचे. मग मोर्चा पुन्हा घराकडे… मामीने फोडणीची भाकरी, तिखटमिठाचा सांजा किंवा उकडपेंडी केलेली असायची. त्यावर ताव मारून झाला की चौकातल्या ओसरीत आमची शाळा भरायची. कुणाच्या मळ्यातल्या काकडी टरबुजांवर डल्ला मारायचा? गुलाबं कुठून तोडायची, किंवा कैऱ्या, पेरू, जांभळं कुठून मिळवायची याची खलबतं व्हायची. 

मामाचे एकत्र कुटुंब असल्याने सख्खे, चुलत, मामा-मावश्‍यांची मिळून आम्ही वीस एक मुलं होतो. त्यांचे ग्रुप झाले की निघायचे सारे वीर कामगिरीवर. मी नेहमी कैऱ्या-पेरूवाल्यांच्या ग्रुपमध्ये असायचे. कारण मला झाडावर चढायला आवडायचं खूप आणि हो, कैऱ्या गोळा करताना पण एक नियम असायचा; पाखरांनी कुरतडलेल्या कैऱ्याच फक्त तोडायच्या. कारण त्या गोड, पिकुटलेल्या असायच्या म्हणे! गुलाबी गरांचे पेरू, चिंचा आणि कैऱ्यांनी फ्रॉकचा ओचा भरून जायचा दुपारपर्यंत. 

उन्हंही माथ्यावर आलेली असायची. घरी परत आलं की ज्याने त्याने आपापल्या ऐवजाचा ढिग करून ठेवायचा आणि वाड्यामागच्या विहिरीचे पाणी शेंदून अगदी खळखळून हातपाय धुवायचे. त्या विहिरीजवळ एक जुने पिंपळाचे झाड होते. असं वाटायचं की ते सदान्‌कदा विहिरीशी गप्पा मारतं की काय? त्याच्या सळसळीने विहिरीच्या पाण्यात तरंग उठायचे, एखादे पान गिरक्‍या खात विहिरीत पोहायला उतरायचे. पण मला आजी किंवा मामी त्या विहिरीजवळ फारशा जाऊ देत नसत आणि त्याचे कारणही सांगत नसत. मग मीही त्यांचा डोळा चुकवून जायचे त्या पिंपळाजवळ अन्‌ त्याची सळसळ ऐकताना रमून जायचे. 

दुपारची मुलांची पंगत बसली की, आणलेल्या काकड्या-कैऱ्यांच्या फोडी पानांत वाढल्या जायच्या; पण त्यावर आजीच्या खमंग रागवण्याचं तिखट-मीठही असायचं. कारट्यांनो, कशाला आणता असं लोकांच्या वाट्याचं गोळा करून. आजी रागवायची अन्‌ मग पदर तोंडाला लावून गालातल्या गालात हसायची. तिलाही तिचं बालपण बहुतेक आठवत असावं तेव्हा. जेवणानंतर आमचा मोर्चा पुन्हा ओसरीत यायचा. आता दुपार झालेली असायची. कोटरात लपलेल्या चिमण्या, भोरड्या, साळुंक्‍या किडे-दाणे टिपायला चौकात जमायच्या. त्यांची आमची कलकल एकमेकांत मिसळून मस्त रॅपसॉंग तयार व्हायचं. चल्लस, ठिकरी, गजगे किंवा पत्ते हे आमचे दुपारचे ठरलेले खेळ. ठिकऱ्यांसाठी कोयी गोळा केलेल्या असायच्या.

कोयीनेच तो ढिग फोडायचा, तेव्हा मातीत टप्पे घेत जाणारी ती कोय आजही डोळ्यांसमोर उभी राहते. आजीच्या खोलीशेजारीच एक बाळंतिणीची खोली होती. त्यात आंब्यांची अढी लावलेली असायची. त्या आंब्यांवर मनसोक्त ताव मारणे हा दुपारचा एक साग्रसंगीत कार्यक्रम होता. हळूहळू उन्हाचे कवडसे लांबत जायचे तसे माझे डोळेही मिटायला लागायचे. आंब्याची गोडी पापण्यांवर रेंगाळायला लागायची. मग तिथेच ओसरीत चटईवर मी डुलकी घ्यायचे ते थेट गाईंच्या घुंगरांचा आवाज ऐकू येईपर्यंत. संध्याकाळ दाराशी उभी असायची. गाई दिवसभर डोंगरावर चरून परतलेल्या असायच्या. खंडोबाच्या देवळातही संध्याकाळची दिवेलागणीची तयारी सुरू व्हायची.

मी हट्ट करून आजीच्या पाठुंगळी बसून खंडोबाच्या मंदिरात जायचे. अन्‌ लगेच आजीचा डोळा चुकवून घरी सुंबाल्या करायचे. मामा शेतातून घरी आलेला असायचा. त्याची संध्याकाळच्या धारा काढण्याची गडबड सुरू व्हायची. आमची चंद्री नावाची एक गाय होती. तिच्या कपाळावर चांदाचा तुकडा होता म्हणून ती चंद्री. मी तिच्या पाठीवर झोपायचे, तिची पोळ खाजवायचे पण तिने कधीच मला काहीच केले नाही.
आजोबा बॅंकेतून याच वेळेला घरी परत यायचे. त्यांच्या सायकलची घंटी वाजली की आम्ही मुले त्यांना गराडा घालून सायकलच्या फेरीचा हट्ट धरायचो. मग आजोबाही रोज दोघांना, याप्रमाणे आम्हाला सायकलवरून फिरवून आणायचे. आज हाताखाली दुचाकी, चारचाकी असली तरी त्या सायकलफेरीची सर नाही. सारे मनाचेच खेळ.

आपलं मन किती उलटबाज असतं ना! जे नाही त्याच्यासाठी झुरतं पण म्हणूनच त्या गोष्टींच्या आठवणी जपतं. जसं की या लहानपणीच्या आठवणी. ज्या मला ताजे करतात. मामाचे बाळ्या आणि बिजल्या नावाचे थोराड मोठ्या चणीचे बैल होते. अगदी नंदीबैलासारखेच. बाळ्या काळापांढरा आणि वांड होता तर बिजल्या एकदम शुभ्र आणि तितकाच शांत. गाडीला जोडले की बैलगाडी देखणी दिसायची. शहरात जाताना हमखास बैलगाडीतूनच जायचं. मस्तपैकी गाडीत मागे बसून पाय खाली सोडायचे अन्‌ पिंपरणींच्या पिपाण्या करून वाजवायच्या. कधीकधी गाईंच्या मागून डोंगरावर जायचं आणि गाईंना चरायला सोडून रानात दिवसभर भटकायचे. डोंगरावर दोन गुहा होत्या. एकीत तळे होते आणि दुसरीत खंडोबाचे मंदिर होते.

एकदम जागृत स्थान. डोंगरावर वाराही भन्नाट वाहायचा. गुहेतल्या तळ्याचे पाणी एकदम गारेगार वाटायचे. दिवसभर डोंगरावर पाखरांमागे उंडारल्यावर डबे खायचे ते खंडोबाच्या गुहेत आणि नंतर तळ्यातल्या पाण्याने भागवलेली तहान म्हणजे… काय वर्णावी ती गोडी!

औरंगाबादचा उन्हाळा मात्र भयंकर असायचा. जनावरांसाठी वैरणही नसायची कधी कधी. सगळ्या विहिरी तळी कोरड्या व्हायच्या. जरी गोदामाई होती तरी पाणी नसायचे. अशावेळी लमाण तांड्यावर जाऊन जनावरांसाठी घास आणि माणसांसाठी हायब्रीड ज्वारी आणावी लागायची. त्या घासाच्या पेंड्या आणणं, पखालजीसोबत पाण्यासाठी; शेतातून घरी आणि घरातून शेतात फेऱ्या मारणं, रेशनच्या रांगेत उभारून गहू/तांदूळ आणणं, भाजी नसल्यावर कारळ्याची चटणी आणि तेलाबरोबर भाकरी खाणं. 

या सगळ्या अनुभवांची शिदोरी आहे जमेला. तेव्हा समजत नव्हती तरी अशी अनेक चित्रं मनाने टिपलेली असायची. दुष्काळानं गांजलेले लोक घरी यायचे. आपली मनं मोकळी करायचे तर कधी आपली जित्राबं वाड्याच्या आसऱ्याला सोडून जायचे. बाया-बापड्या चेहरा लपवत यायच्या. मामीजवळ रडायच्या अन्‌ जाताना पदरात ताक-भाकरी बांधून न्यायच्या. त्यांचे समाधानाने भरलेले चेहरे बघून आम्हाला आश्‍चर्य वाटायचं. येताना रडवेल्या होऊन आलेल्या बाया जाताना हसऱ्या चेहऱ्यानं कशा काय जातात? आजी, मामीजवळ अशी कोणती जादू होती बरं? 

एखाद्या दिवशी सोसाट्याचा वारा सुटायचा. वाड्यामागचा पिंपळ वेडावून सळसळायचा. मामीने सकाळीच कुरड्या-खारोड्या वाळत घातलेल्या असायच्या. आजी दारातूनच आम्हा मुलांना हाकारायची; मग कोण घाई ते वाळवण उचलण्याची. तेवढ्यात विजा चमकायला लागायच्या. ढगांचे नगारे वाजायला लागायचे आणि सटासट गारांचा मारा सुरू व्हायचा. गारा वेचण्याची आम्हा मुलांची धडपड रंगायची. चौकावर कचकड्याची गच्ची होती. गारा कोणत्या आणि गारगोट्या कोणत्या तेच कळायचं नाही. चौकात बांधलेल्या गाई, शेळ्या अंग चोरून वळचणीला शिरायच्या. चौकातल्या मातीत अत्तराची नुसती उधळण व्हायची. सारा वाडा सुगंधानं भरून जायचा. पावसात मनसोक्‍त भिजल्यावर आजीच्या हातचा “धपाटा’ अन्‌ नंतरचा गुळाचा शिरा. दोन्ही चवदार असायचे.

संध्याकाळच्या शांत वातावरणात पिंपळाच्या पारावर, तुळशीच्या कोनाड्यात ठेवलेली सांजवात असो किंवा देव्हाऱ्यातला नंदादीप. त्यांना पाहिले की, आपोआपच हात जोडले जायचे. शुभंकरोतीचे अर्पित सूर मनातून घुमायला लागायचे. नंदादीपाच्या प्रकाशात देवघरातला काशीविश्‍वेश्‍वर न्हाऊन निघायचा. तेव्हा असं वाटायचं की जणूकाही तोही आम्हा मुलांसारखाच प्रार्थनेत हरवलाय की काय? अन्‌ अन्नपुर्णेच्या चेहऱ्यावरची सात्विकता अजूनच उजळल्यासारखी वाटायची. आम्हा मुलींना आजी अन्नपुर्णा स्तोत्र शिकवायची. म्हणायची, तुम्ही अन्नपुर्णेच्या मुली आहात. ज्यांच्या घरी जाल त्यांची घरं समृद्ध करा. आजीची ही शिकवण कायमची मनावर कोरली गेलीय. आजही देवघरातली अन्नपुर्णा बघितली की आजीचा चेहरा समोर येतो आणि तिचे शब्दही!

खरंच आपले लहानपण हे आपल्या भावी जीवनाचा आरसा असते. जे अनेक प्रसंगांचे अनुभव आणि आठवणींचे लिंपण असते. लहानपण हे गर्व नसलेल्या अशा निरागसतेचे प्रतीकच आहे. जेव्हा विकारांचे कोणतेच लेपन मनावर आणि शरीरावर असत नाही. फक्त निरागस भाव असतो. आपले जग मर्यादित आणि सुरक्षित असते. लहानपण दे गा देवा, असे म्हणणाऱ्या तुकोबारायांनाही विकारहीन निरागसताच अपेक्षित असावी. म्हणून त्यांनाही परत लहान व्हावेसे वाटले असावे. माझ्यासमोर जर कोणी पर्याय ठेवला की तुला आयुष्यात पुन्हा काही परत हवे असेल तर तू काय मागशील? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी म्हणेन, माझे लहानपण, जे माझी हरवलेली स्वप्ने आणि संपत चाललेली निरागसता मला परत करेल. म्हणूनच म्हणावेसे वाटते,

आठवणींच्या तळहातावर;
बालपणीची स्वप्ने रुजती,
ओंजळीत ती जपून घ्यावी;
डोळ्यांमधुनी जी झरती…

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.