#प्रभात_दीपोत्सव_२०२० : इनोसन्ट लोट्‌स

– निर्मोही फडके


एक… दोन… तीन… चार… भिंतीत रुतलेले ते लाकडी चार गज. त्यानं पुन्हा पुन्हा त्या गजांवरून हात फिरवला. चार… चार वर्षांचीच होती ती. नव्हे, खरंतर चौथं नुकतंच लागलं होतं तिला. वर्गातला चंदू तसा जरा टारगटच. मोठाड अंगाचा. दादागिरी करणारा. गावात अगदी मोजक्‍याच घरांत टीव्ही आला होता, त्यापैकी एक घर होतं चंदूचं. त्या टीव्हीमधले रविवारचे सिनेमे, छायागीत असलं काही बघायला तो विशूला बोलवायचा. दोन-तीन वेळा विशू गेला, 

पण ते टीव्ही प्रकरण इतकं काही त्याला आवडायचं नाही. तो आणि त्याची चित्रं, हेच जग होतं त्याचं. त्याच्यापुरतं. तेच आवडायचं त्याला.

चौथीचं वर्षं चालू असताना चंदूला लहान बहीण झाली. विशूला खूप गंमत वाटली ते मुलगी बाळ बघून. आपल्याकडे हवं असं मुलगीबाळ म्हणून त्यानं हट्टं केला आईकडे. आजी आणि आई, दोघी खुदुखुदु हसल्या.

“ऐक आता लेकाचं तरी,’ आजी आईकडे बघून असं का बोलली, हे त्याला कळलं नाही.
एक दिवस चंदूनं त्याला एक चित्र काढून दाखवलं. खूपच वेगळं वाटलं होतं तेव्हा ते.
“”चंद्या, काये रे हे?”
“”अरे, सॉलिड गंमत. ये कानात सांगतो.”
नंतर चंदूनं कानात जे काही सांगितलं, त्यामुळे त्याचे डोळेच विस्फारले.
“”हे असं असतं?”
“”अरे, हो. म्हणून तर सांगतोय.”
“”पण म्हणजे तू हे…”

“”चूप, त्याच्याशी तुला काय करायचंय? बोलू नकोस कुणाला. हे असं सगळ्यांशी नसतं बोलायचं.”
त्या दिवसापासून विशूच्या डोळ्यांसमोर तेच चित्र येऊ लागलं. दोन पाकळ्यांची कमळाची कळी. झोपेतही स्वप्नात एक-दोन वेळा दिसली ती. “आपल्याला कमळाची अशी कळी प्रत्यक्ष कधी बघायला मिळेल? चंदूकडे इतक्‍या वेळा गेलो, पण काही दिसली नाही.’

विशूची दिवाळीची सुट्टी चालू झाली; पण त्याला न आवडलेली एक घटना घडली. “”अरे आम्ही आमच्या नव्या घरी राहायला जातोय दिवाळीत. खूप मोठ्ठं घर आहे, पण लांब आहे रे.” “” ये हां तू रविवारचा. सिनेमा बघायला.” चंदू डोळे मिचकावत म्हणाला. विशू थोडा हिरमुसला झाला. चंदूच्या कुटुंबाचं नव्या घरी राहायला जाणं, चंदूनं तिकडल्या शाळेत प्रवेश घेणं, या सगळ्याचा परिणाम म्हणजे विशू आता अगदी खरंच एकलकोंडा झाला. यातूनच तो रंगरेषांच्या अधिक जवळ जाऊ लागला. तासन्‌तास चित्रांमध्ये आपलं मन गुंतवू लागला. पण ती कमळाची कळी काही त्याचा पिच्छा सोडत नव्हती. कितीतरी कागद फाडले त्यानं.

“”अरे विशू, का बाबा कागदं फाडतोस अशी?” एकदा आजीनं विचारलं.
“”काई नाई.” इतकं बोलून विशूनं पुन्हा एक कागद फाडला.
मनासारखी जमतच नव्हती ती कमळाची कळी.

महाशिवरात्रीला गावाबाहेरच्या तळ्यापाशी असलेल्या हरेश्‍वराच्या मंदिरात उत्सव रंगला होता. आजीबरोबर मंदिरात गेलेला विशू मंदिरामागच्या तळ्यापाशी गेला. ओहोहो… शेकडोंनी कमळं फुललेली नि कितीतरी कळ्याही. पाण्यात उतरावंसं वाटलं त्याला, एक तरी कमळ हवं. तो उताराच्या दिशेनं सरकला.

“”विशू, पाण्यापाशी नको जाऊस. इकडे ये वर.” आजीच्या हाकेनं भानावर आलेल्या विशूला दिसल्या, आजीच्या हातातल्या पूजेच्या तबकात कमळाच्या कळ्या. एक गुलाबी नि एक पांढरी.
“”आजी, मला गुलाबी कमळ हवंय.”
“”अरे, देवाकरता घेतलीत. जाताना घेऊ तुझ्याकरता एक विकत.”
विशू आनंदला. आजीनं खरंच एक गुलाबी कळी घेतली त्याच्याकरता. तिला स्पर्श करताच विशूच्या अंगावर शिरशिरी उठली. कित्ती मऊ. “हिचं चित्र काढलं पाहिजे.’ असा विचार करत त्याची संध्याकाळ त्या कळीभोवतीच गुंतून गेली होती.

“”आज्जी, अगं कालचं कमळ कुठाय?” सकाळी उठल्या उठल्या विशूनं विचारलं. खिडकीत एका बाटलीत पाण्यात ठेवलेलं कमळ त्याला कुठे दिसेना. “”अरे, सुकलं बाबा ते, निर्माल्य झालं त्याचं.” “निर्माल्य? म्हणजे? जाऊ दे. आजीचं असेल काही.’ विशू वैतागला. पण त्याच्या चित्रकलेत ती कळी, ते तळं झिरपून गेलं होतं.

“तरीही चंद्यानं दाखवली तशी कळी कुठे बघायला मिळेल?’ विशूच्या मनात एक अस्वस्थता होती.
मे महिन्याच्या सुट्टीत आत्या राहायला आली. जवळजवळ दोन वर्षांनी. ती खूप लांब राहणारी, तिकडे कुठं बेळगावला. तिची मुलगी आनंदी. नुकतंच चौथं वर्षे लागलेलं तिला. आत्या महिनाभर राहणार, आनंदीही आता खेळायला असणार म्हणून विशू हरखून गेला. आपलं एकलकोंडेपण विसरला. घरभर, अंगणभर दोघांचं हुंदडणं चालू झालं.

त्या दिवशी आज्जी आणि आत्या अंगणात पापड करत बसल्या होत्या. विशू पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला. स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूला असलेल्या मोरीत पाण्याचा आवाज येत होता. “नळ चालू राहिलाय वाटतं,’ असं पुटपुटत विशूनं वाकून बघितलं नि त्याचे डोळे विस्फारले. चंदूचं दाखवलेलं चित्र असंच होतं. दोन पाकळ्यांची कमळाची कळी. थोड्या विलग झालेल्या पाकळ्या. क्षणभर तो घाबरला, आपल्याला कुणी बघेल, ओरडेल म्हणून. पण… बघत बसावसं वाटलं. त्या दिवसानंतर नादच लागला त्याला.

जेव्हा संधी मिळेल तेव्हा निरखायचं त्या कमळाला. मग एक दिवस त्यानंही चित्र काढलं चंदूसारखं. कमळाच्या कळीचं… आणि फाडलं नाही. गुपचूप ठेवून दिलं आपल्या एक चित्रांच्या पुस्तकात दडवून. एक दिवस वाटलं, हात लावून बघावं त्या कळीला. कसं असतं ते? कधी बघता येईल? तशी संधीही मिळाली. रविवारची निवांत दुपार. वातावरणात दुपारची स्तब्धता. माजघरातल्या अंधारात त्यानं हळूच डोकावून पाहिलं. अंदाज घेतला नि तो पुढं सरकला. ती आजीजवळ शांत झोपलेली. कमळाची कळी. फक्‍त एकदा पाहायची होती जवळून नि हाताळायची होती.

त्यानं अलगद त्या लपलेल्या कळीवरचा कपड्यांचा अडथळा बाजूला सारला. दिसल्या. मऊसूत दोन पाकळ्या. खोलीच्या लहानशा खिडकीतून आत येणाऱ्या दुपारच्या उजेडाचा एक इवलासा झोत फरशीवर पडला होता. त्या हलक्‍या उजेडात उजळून निघाली होती ती कळी. विशू त्या पाकळ्यांवरून हात फिरवू लागला. मऊ, मुलायम पाकळ्या. विशूला आठवली, गावातल्या हरेश्‍वराच्या मंदिरामागच्या तळ्यातली कमळं. अर्धवट उमलेली गुलाबी कमळाची लहानशी कळी. असाच मुलायम होता तिचा स्पर्श. भान हरपून तो हात फिरवत राहिला.

त्यानंतर जेव्हा संधी मिळेल तेव्हा विशू ती कळी पाहायचा, हाताळायचा अगदी कुणाच्याही नकळत. गुपचूप. खूप काही वेगळं वाटायचं, पण काय ते उमजायचं नाही.

त्या खोलीतला तो थंड काळोख, खोलीला असणाऱ्या एकाच खिडकीतून आत येणारा हलका कवडसा नि त्या कवडशामुळे उमलल्यासारखी वाटणारी ती कळी. विशूकरता ते सगळं खूपच अनोखं होतं. त्याच्या चित्रकलेच्या वहीत आता कमळाच्या कळ्यांची अनेक चित्र उमलू लागली. मे महिन्याचा शेवटचा आठवडा. उन्हाची काहिली शिगेला पोचलेली. आजी सारखी बडबडायची, “वळीव पडेल, वळीव पडेल.’ आई, आत्या नि आजी तिघी वाळवणांची आवराआवर करू लागल्या.

एक दुपार. अंधारून झाकोळलेली. सगळीकडे सामसूम. वळीवाचा जबरदस्त मारा कौलांवर. अंगणात चक्‍क पाणी साठलं या पावसानं. विशू भीज भीज भिजला. साचलेल्या पाण्यात कागदाच्या नावा करून सोडताना त्याचं बालमन त्या नावांवर तरंगू लागलं. विशूला मजा वाटत होती. आई, आत्या हाका मारून थकल्या नि बहुतेक झोपल्या.

ओसरीतल्या झोपाळ्यावर झोके घेत बसलेल्या छोट्या आनंदीला काही पाण्यात भिजावंसं वाटत नव्हतं. पाण्याची तिला फार भीती वाटायची. पण त्या साचलेल्या पाण्यावर डुलणाऱ्या नावा मात्र तिला खुणावत होत्या. झोपाळ्यावरून ती हळूच खाली उतरली. घराच्या अगदी वरच्या पायरीपर्यंत आलेल्या पाण्याच्या इवलाल्या लाटांनी एक कागदी नाव वाहवत आणली होती.

आनंदीला ती नाव खुणावत होती. विशू आपल्याच नादात कितीतरी वेळ पाण्यात डुंबत होता. पायरीपाशी जेव्हा त्याचं लक्ष गेलं तेव्हा तो थिजल्यासारखा झाला. आनंदीचा पांढरा फ्रॉक पाण्यानं फुगून वर आलेला. पाण्यात पडून घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या, चिंब भिजलेल्या इवल्याशा आनंदीला विशूनं अलगद उठवलं. कसंतरी उचलून ओसरीत फरशीवर बसवलं. भीतीनं तिच्या तोंडून रडूही फुटत नव्हतं. ते तिनं घशातच कोंडून घेतलं. तिला श्‍वास लागला होता. कसंतरी तिला समजावत, समजावत विशूनं झोपाळ्यावरचा टॉवेल ओढला नि तिच्या अंगाभोवती गुंडाळला.

थंडीनं नि भीतीनं आनंदी थरथरत होती. तिचे ओलेचिंब कपडे उतरवणं गरजेचं होतं. झाकोळलेल्या आभाळानं अवेळी अंधार केला. विशूला दिसली ती कमळाची लहानशी कळी. दोन पाकळ्यांची. पावसात भिजलेली. तिच्यावरून विशूचा हात हलकेच फिरू लागला. वळीव धुमाकूळ घालत होता. “किती सुंदर आहे हे. आज असं बघताना काही वेगळंच वाटतंय. हा पाऊस नि आपल्यासमोर… खरंच हे असंच्या असं चित्र काढता आलं पाहिजे.’

पायरीपाशी अडकलेली कागदी नाव हेलकावे खात पुढं गेली. एव्हाना आनंदी गारठून पुतळ्यासारखी झाली होती. अंगणातल्या साचलेल्या पाण्यानं मातीत झिरपत जावं तसं भयामुळे कोंदटलेलं तिचं रडणं तिच्या घशातच झिरपू लागलं. तिचे ओठ कोरडे पडले होते. चेहरा पांढराफटक झाला होता. विशू भानावर आला. आनंदीची अवस्था बघून घाबरला. गारठलेल्या आनंदीच्या अंगाभोवती भराभरा टॉवेल गुंडाळत त्यानं आईला, आजीला हाका मारल्या.

आज अनेक वर्षांनी गावातील जुन्या घराच्या त्या खोलीतल्या अंधारात शिरताना चित्रकार विश्‍वनाथ मुजुमदार याची नजर खोलीभर फिरत होती. 

एक… दोन… तीन… चार…
भिंतीत रुतलेले ते लाकडी चार गज. त्यानं पुन्हा पुन्हा त्या गजांवरून हात फिरवला.
चार… चार वर्षांचीच होती ती. नव्हे खरंतर चौथं नुकतंच लागलं होतं तिला. आनंदी. दु:खाचा एक हळवा, अबोल कोपरा कायमच मनात ठेवून गेलेली.

आनंदी न्यूमोनिया होऊन कायमची निघून गेली. आधीच कफानं भरलेली छाती आणि पाण्यात भिजणं, गारठणं तिच्या नाजूक तब्येतीला झेपलं नाही. चार-पाच दिवसांतच सगळं उरकलं. कागदी नावांनी वाहून नेली आनंदी-विशूची कथा नि व्यथा.

ज्येष्ठ-आषाढ मुसळधार कोसळले. श्रावणातल्या ऊनपावसानं आपले खेळ मांडले. त्या खिडकीतून श्रावणाचं लोभस, ओलसर ऊन खोलीत येऊ लागलं पण विशूला त्याचे चटके सहन होईनात. एक दिवस त्यानं ती खिडकी बंद करून तिची लाकडी दारं दोरीनी घट्टं बांधून टाकली. ते कवडसे त्याला नकोच होते. कमळाच्या कळ्यांच्या चित्रांनी भरलेली ती वही त्या खोलीतल्या कपाटात, अगदी आत टाकून दिली.
विशूची राखीपौर्णिमा आनंदीच्या आठवणीत मूक होऊन रडण्यातच संपली. त्याला नकोसे झाले होते ते कमळाचे विचार. त्यानं ठरवलं, आता कधीच नाही काढायचं कमळाचं चित्र.
पण…

मुंबईतल्या मोठ्या कला महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विश्‍वनाथ मुजुमदार यानं एका आंतराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. कल्पनेच्या पातळीवरील नग्नता नि तिचा केलेला नैसर्गिक, कलात्मक विचार ही थीम होती त्याची. नवोदित चित्रकार म्हणून नाव कमावू लागलेल्या विश्‍वनाथ मुजुमदार याच्या “इनोसन्ट लोट्‌स’ या पेंटिंगला जागतिक पातळीवरील या न्यूड चित्रकला स्पर्धेत उदयोन्मुख चित्रकाराची उत्तम कलाकृती म्हणून पुरस्कार मिळाला. “इनोसन्ट लोटस’ला चित्रप्रेमींकडून मागणी येऊ लागली. चित्रकार विश्‍वनाथला इनोसन्ट लोटसनं कलाक्षेत्रात स्थान मिळवून दिलं.

त्या अंधाऱ्या खोलीला असलेल्या खिडकीच्या छोट्या दारांना बांधलेली दोरीची गाठ विश्‍वनाथनं प्रयत्नपूर्वक सोडली. खिडकी उघडली. खिडकीतून उन्हाचा हलकासा आनंदी कवडसा आत आला. विश्‍वनाथच्या हातात जुनाट, पिवळसर पानांची चित्रांची वही होती. नैसर्गिक अन्‌ अतिशय निरागस नग्नता आपल्या चित्रांतून जपणाऱ्या निष्पाप विशूच्या वहीतील कमळाच्या कळीवर तो आनंदी कवडसा हलकेच उतरला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.