#प्रभात_दीपोत्सव_२०२० : मदतनीस

– बबन पोतदार


दुपार टळून गेली होती. उन्हं परतीच्या प्रवासाला लागली होती. सावल्या लांब होत चालल्या होत्या. रस्त्यावर तुरळक गर्दी होती.  मी घराच्या गच्चीत उभा होतो. आज सकाळपासून मनाचा कोंडमारा होत चालला होता. सकाळी सकाळीच सुरेशकाकांचा फोन आला होता.

“संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी येतोय,’ असा निरोप त्यांनी दिला होता. एका गरीब कुटुंबाला थोड्या आर्थिक मदतीची गरज आहे, असा निरोप त्यांनी दिला होता. गच्चीत उभा राहून मी त्यांची वाट बघत होतो. भिंतीवरच्या घड्याळाकडे माझं लक्ष गेलं. घड्याळ सव्वापाच वाजल्याचं सांगत होतं.

एवढ्यात दारावरची बेल वाजली. अपेक्षेप्रमाणे दाराबाहेर सुरेशकाका उभे होते.
“”या काका,” मी हसून त्यांचं स्वागत केलं.

“”सॉरी हं, 15-20 मिनिटांचा उशीर झाला पोहोचायला. पाच वाजता येतोय असं म्हणालो होतो. आता साडेपाच होत आलेत,” आत येता येता ते म्हणाले.

“”असुद्या हो काका. चालतोय एवढा उशीर,” मी त्यांच्या दिशेनं खुर्ची सरकावीत म्हणालो.

“”चालतंय कसं हो, विनायकराव? माणासांन कसं वक्तशीर असावं. दिलेला शब्द आणि वेळ जो पाळतो तो वंदनीय तर असतोच, पण भरवशाचाही असतो,” खुर्चीत बसता बसता काका बोलले.

त्यांचा आवाज ऐकून माझी सौ. आतल्या खोलीतून बाहेर आली. तिच्या हातात पाण्याने भरलेला तांब्या आणि भांडे होते. “”घ्या काका थंडगार पाणी घ्या.” तिने हसून त्यांचे स्वागत केले.

“”पाणी घेतोच, पण नीमाताई, थोडं सरबतसुद्धा हवंय तुमच्या हातचं. साडेपाच झालेत तरी अजुनी हवेत उकाडा जाणवतोय हो,” काका तिच्याकडे बघत बोलले.

“”करते की, थंडगार वाळ्याचे सरबत करून आणते. बसा तुम्ही,” आत जाता जाता ती म्हणाली.
खरं म्हणजे सुरेशकाका एक दिलखुलास माणूस. मनाचा दिलदारपणा हेच त्यांच्या सुखी आयुष्याचं रहस्य. दिसायला साधारणपणे साने गुरुजींसारखे. प्रसन्न चेहरा हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. एस.टी. खात्यातून 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेले. सेवा निवृत्तीनंतरही औद्योगिक कोर्टात ते एका वकिलाबरोबर काम करीत होते. अविरत काम करायचे ते. “थकणे’ जणू त्यांना ठाऊकच नव्हते. सदासर्वकाळ काहीतरी खटाटोप चाललेलाच असायचा. त्यांचा हाच गुण मला आवडायचा.

आमच्या कुटुंबावर त्यांची अपार माया. जेव्हा जेव्हा ते घरी येत असत त्या प्रत्येक वेळी माझे घर आनंदाने न्हाऊन निघायचे.

“”कुणाला करायचीय मदत? कशासाठी करायचीय?” मी त्यांना विचारलं.
“”सांगतो, सगळं सांगतो. अगदी सविस्तर सांगतो.” माझ्या डोळ्यात बघत काका उत्तरले.
“”सावकाश सांगा. काही घाई नाही,” सरबत घेऊन आलेली माझी पत्नी काचेचे ग्लास टेबलावर ठेवता ठेवता म्हणाली.

सरबत घेऊन झाल्यावर सौ.ने तिन्ही रिकामे ग्लास उचलले आणि ती आतल्या घरात जाऊ लागली. तिच्याकडे बघत मी तिला म्हणालो, “”बैस तू पण इथंच. काका काय काम काढून आलेत ते तुलाही ऐकायचंय ना? थांब इथं.”

बाजूच्या मोड्याचा आधार घेत ती समोर बसली. आम्ही दोघेही काकांच्या डोळ्यात बघत होतो. “”कुणाला करायचीय मदत?” मी मघाचाच प्रश्‍न पुन्हा विचारला.
“”हरीभाऊ महाशब्दे नावाचे गृहस्थ आहेत, विनायकराव,” माझ्याकडे बघत काका बोलले.
“”हो का? कुठे राहतात?” मी.

“पुण्यातच राहतात. तिकडे सुखसागरनगरला त्यांचे कुटुंब आहे,” काका. “”तब्बेत बरी नाही का? कशासाठी मदत करायची त्यांना?” सौ.चा प्रश्‍न. “”तब्बेतीचे कारण नाही. हरिभाऊंना आहेत पाच मुली. सगळ्यात मोठी आहे चौदा वर्षांची. दोन दोन वर्षांच्या अंतराने तिच्या पाठोपाठ अजुनी चारजणींना जन्म दिलाय त्यांनी.” काका. 

“”बाप रे!’ मी ओठांचा चंबू केला.
“”काय सांगताय काका?” माझ्या पत्नीचा चेहरा विचारता झाला.
“”तेच तर सांगायचंय तुम्हाला. हरीभाऊ, त्यांची पत्नी आणि पाच मुली असं ते सप्तरंगी कुटुंब एका पत्र्याच्या घरात राहतेय. मी स्वत: बघून आलोय.” काकांनी पुढची माहिती पुरविली.
“”बाई गं. ह्यांना करायची मदत?” सौ.चा स्वाभाविक प्रश्‍न तिच्या तोंडून बाहेर पडला.
“”हो नीमाताई, यांनाच मदत हवीय,” काका म्हणाले आणि माझ्याकडे बघायला लागले.
“”हो, पण ते हरीभाऊ करतात तरी काय?” मी त्यांना विचारलं.

“”तेच तर सांगायचं आहे तुम्हाला. त्यांचा व्यवसाय ऐकून चक्रावून जाल तुम्ही दोघेही.” काका सांगू लागले.
“”म्हणजे?” नीमाचं कुतूहल जास्तीच वाढलं होतं.
“”सांगा तरी!” मी त्यांना म्हणालो.
“”अहो, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर एक पथारी अंथरून हे गृहस्थ घड्याळे दुरुस्त करण्याचे काम करतात. दररोजची मिळकत काय असेल, तुम्हीच विचार करा.” काकांनी आम्हा दोघांची उत्सुकता जास्ती न ताणता सांगून टाकले.

“”ऐकावं ते नवलच!” नीमा माझ्याकडे बघत म्हणाली.
“”मग काय तर. आता घड्याळे दुरुस्तीला कोण घेऊन जातंय हो? आणि तेही फुटपाथवरच्या पथारीवाल्याकडे?” मी म्हणालो.
“”तेच तर म्हणायचंय मला. हरिभाऊंची रोजची कमाई दहा रुपयांचीसुद्धा नसेल,” काका.
“”आणि पदरी पाच पोरींचा लोढणा. खरंच कसं करत असतील हो?” नीमाचा नेमका प्रश्‍न.
“”म्हणूनच आपण मदत करूया त्यांना,” काका आमच्या दोघांच्या डोळ्यात आलटून पालटून बघत बोलले.
“”नाही काका. या कुटुंबाला मदत करावी, असं मला तरी वाटत नाही,” मी काकांचा प्रस्तावच खोडून काढीत म्हणालो.

“”मलाही असंच वाटतंय,” नीमाने माझीच री ओढली.
क्षणभर काका थबकले. आमचं दोघांचं बोलणं त्यांना खटकलं असावं.
“”का बरे?” त्यांनी प्रश्‍न केला.
“”काका, या कुटुंबात एका पाठोपाठ पाच मुली जन्मल्या असं म्हणालात तुम्ही मघाशी. अहो, सामाजिक भान नसलेलं हे कुटुंब मदत करण्यायोग्य नाहीच, असं म्हणायचंय मला,” नीमा म्हणाली.
“”मीही हेच म्हणतोय. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नये, असं सगळं जग सांगतंय. वंशाला दिवा असावा, एखादा तरी मुलगा असावा या विचाराने हरिभाऊंनी पाच मुलींना जन्माला घातलं! अशा विचारसरणीच्या माणसाला मदत करणे ठीक नाही, असं माझंही मत आहे,” मी नीमाच्या विचाराला दुजोरा दिला.

“”खरं आहे तुमचं दोघांचं. पण विनायकराव, मला सांगा, यात त्या मुलींचा काय दोष आहे हो? त्यांनी काय पाप केलंय? थोडा विचार करा. मी मदत करा असं म्हणतोय, ते हरीभाऊंना नव्हे, तर त्यांच्या दोन मोठ्या मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावा, असं म्हणतोय.” काका माझ्या डोळ्यात बघत बोलत होते.
“”म्हणजे?” माझा पुढचा प्रश्‍न.

“”विनायकराव आणि नीमाताई, त्या कुटुंबातली सर्वात मोठी मुलगी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तिच्या पाठची यंदा दहावीला आहे. दोघींचीही वार्षिक फी थकलेली आहे. फी भरली नाही तर त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. “मुलगी शिकली तर समाज शिकतो’ असं म्हणतो आपण. होय ना?” काकांनी त्यांचं सडेतोड मत मांडले.

“”तेही बरोबरच आहे म्हणा,” नीमा माझ्याकडे बघत बोलली. मलाही काकांचा मुद्दा बरोबर आहे असं वाटायला लागलं.
“”किती फी भरायची आहे दोघींची?” मी विचारलं.
“”मोठीची आहे पंधरा हजार आणि दुसरीची आहे बारा हजार.” काका.
“”आणखी कुणी तयार आहे का मदत द्यायला?” मी.
“”नाही, कुणीच नाही. तशी चार-सहा जणांकडे विचारणा केलीय मी, पण सगळीकडून नकारच आलाय. एका सामाजिक संस्थेकडे शब्द टाकलाय मी. त्यांच्याकडूनही अद्याप होकार मिळालेला नाही,” काका.
“”का बरं?” नीमाने विचारलं.

“”ते म्हणताहेत, हरीभाऊंच कुटुंब दारिद्य्ररेषेच्या खाली आहे याचा पुरावा आणि रितसर अर्ज द्या संस्थेकडे.” काका.
“”मग द्या ना तसा लेखी अर्ज.” नीमा.
“”आता पुरावा कुठून देणार हो ते?”
“”का बरं? का नाही देता येणार?” मी काकांकडे बघत बोललो.
“”सोडून द्या विनायकराव. तुम्हाला मदत करायची नसेल तर विषय बंद करूया. एका चांगल्या हेतूने तुम्हाकडे शब्द टाकला होता. तुम्हाला पटत नसेल तर पाहतो मी दुसरीकडे.”

काकांच्या नजरेत थोडी निराशा दिसली मला. त्यांचा आवाजही कापरा वाटत होता. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. काका खिडकीबाहेर बराच वेळ बघत बसले होते.

काही वेळाने नीमाकडे बघत म्हणाले, “”निघतो मी आता. परमेश्‍वराला काळजी त्या पोरींची.”
नीमा मला न्याहाळीत होती. तिच्या डोळ्यांत काहीसा विचित्र भाव दिसला मला. माझ्याकडे बघून तिने मला आतल्या खोलीत येण्याचा इशारा केला. मीही तिच्या पाठोपाठ आत गेलो.

“”मी म्हणते, काकांनी कधी नव्हे तो शब्द टाकलाय आपल्याला. एका चांगल्या कामासाठी मदत करा म्हणताहेत ते. ती करावी असं मलाही वाटतंय. एका मुलीच्या फीची जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे?” आत आल्या-आल्या ती मला म्हणाली.

मलाही तिचं म्हणणं योग्य वाटू लागलं. काहीही फाटे न फोडता मी तिचा हात हातात घेऊन माझी सहमती दाखवली. दोघे बाहेर आलो तेव्हा काका निघण्याच्या तयारीत दिसले.

“”काका, आम्ही एका मुलीची जबाबदारी घ्यायला तयार आहोत,” नीमाने त्यांना सांगून टाकले.
ते ऐकून काकांचा चेहरा उजळला. “”व्वा छान. मला वाटलंच होतं तुम्ही माझी निराशा करणार नाही. कोणत्या मुलीची फी भरताय?” त्यांनी पुढे विचारलं.

“”ते आम्ही ठरवितो. हरीभाऊंशीही चर्चा करतो. तुम्ही निश्‍चिंत राहा. मला त्यांचा पत्ता तेवढा द्या,” मी म्हणालो. काकांनी लगेचच हरीभाऊंचा सुखसागरनगरचा पत्ता आणि मोबाइल नंबरही दिला.
ते निघून गेल्यावर नीमा मला म्हणाली, “”गरीब माणसेही आजकाल मोबाइल वापरू लागलीत. गम्मत आहे नाही?”

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी पत्ता शोधीत हरीभाऊंच्या घरी गेलो. घरात त्यांची पत्नी आणि चार मुली होत्या. मोठी मुलगी सकाळीच कुठेतरी मैत्रिणीकडे गेल्याचे तिच्या आईने सांगितले. “हरीभाऊ मॉर्निंग वॉकला गेलेत’, असं त्यांची मुलगी म्हणाली. मी थोडासा बुचकळ्यात पडलो. घर बऱ्यापैकी व्यवस्थित दिसत होतं. पसारा थोडा अस्ताव्यस्त दिसत होता; पण दारिद्य्राच्या खुणा मला तरी जाणवत नव्हत्या. हरिभाऊंची पत्नी भांबावल्यासारखी वाटत होती. मी अवघडून उभाच होतो. हरीभाऊंना फोन तरी करावा, या विचाराने, मी त्यांच्या पत्नीला “ते फोन घेऊन गेलेत काय?’ ते विचारलं. फोन त्यांच्याकडेच आहे कळल्यावर त्यांचा नंबर फिरविला.

“”हेलो” पलीकडून त्यांचा आवाज आला. मी माझी ओळख सांगून सुरेशकाका यांच्या सांगण्यावरून घरी आलोय, असं म्हणालो. मी पाचच मिनिटांत घरी येतोय, असं बोलून त्यांनी मला घरीच थांबायला सांगितलं. बोलल्याप्रमाणे आले देखील.

“”काय फिरायला गेला होता म्हणे?” मी त्यांना विचारलं. “”फिरायला नाही हो, इथेच गेलो होतो पलीकडच्या गल्लीत होतो. एका गिऱ्हाईकाचं दुरुस्त केलेलं घड्याळ द्यायला गेलो होतो.” त्यांनी निर्विकारपणे सांगितलं. मला ते खरं वाटलं. चार दोन गोष्टी झाल्यावर मी मूळ विषयाला सुरुवात केली. त्यांच्या एका मुलीचे पालकत्व स्वीकारून तिची वार्षिक फी मी भरणार आहे. सुरेशकाकांनी तसं मला सांगितलंय, हे मी हरीभाऊना सांगून टाकले.

“”बरं झालं. देवासारखे धावून आलात.” ते म्हणाले. “”कधी देणार आहात पैसे?” त्यांनी पुढे विचारले.
“”पैसे मी तुमच्याकडे देणार नाही. मुलीच्या शाळेत जाऊन तिथे स्वत: जमा करणार आहे. ज्या मुलीची बारा हजार फी आहे तिच्या शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे नाव सांगा मला.” मी उत्तरलो.
“”का हो, माझ्याकडे नाही देता येणार?” त्यांनी प्रतिप्रश्‍न केला.

मी स्पष्टपणे नकार दिल्यावर त्यांनी मला शाळेचे नाव आणि पत्ता सांगितला. “शाळेची वेळ सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत असते’, अशीही माहिती त्यांनी दिली.

मी घड्याळ पाहिलं. सव्वा नऊ झाले होते. बॅंकेचे चेकबुक खिशातच होते. त्यांच्या घरातून बाहेर पडलो. थेट शाळा गाठली. मुख्याध्यापकांना भेटलो. माझी ओळख सांगितली. कामाचे स्वरूप सांगितले. हरीभाऊंच्या मुलीचे नाव सांगितले आणि शाळेच्या संस्थेच्या नावाचा बारा हजार रुपये रकमेचा चेक अकाउंट विभागाकडे देऊन टाकला.

शाळेबाहेर पडलो तेव्हा 11 वाजून गेले होते. एका गरजू विद्यार्थिनीला मदत केल्याचे समाधान माझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते. बाहेर पडताना सहजच पटांगणाच्या बाजूला असलेल्या भिंतीवरील फळ्यावर लिहिलेल्या सुविचाराकडे लक्ष गेलं.

“अनुभव हा एक विचित्र शिक्षक आहे. तो अगोदर परीक्षा घेतो आणि नंतर धडा शिकवितो.’ असा तो सुविचार होता. मला तो खूप खूप आवडला. खिशातला मोबाइल काढून मी त्या सुविचाराचा फोटो काढून घेतला.

घरी पोहोचलो तेव्हा एक नातेवाईक माझी वाट बघत थांबले होते. एका सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. “”अरे, योगेशजी तुम्ही? कधी आलात?” मी त्यांना विचारलं.
“”झाली 15-20 मिनिटे.” ते म्हणाले.
“”फोन तरी करायचा. मी बाहेर गेलोच नसतो.” मी.
“”असू द्या विनायकराव. एका चांगल्या कामासाठी गेला होतात, असं वहिनी सांगत होत्या.” ते बोलले.
“”हो, एका गरीब कुटुंबातल्या एका मुलीच्या शाळेत जाऊन तिच्या थकलेल्या फीचे बारा हजार रुपये भरून आलो.” मी सांगितलं.
“”गरीब म्हणजे ते हरीभाऊ का? घड्याळवाले?” माझ्या डोळ्यात बघत योगेशजी म्हणाले.
“”अगदी बरोबर.” मी.
“”अरेरे! मोठ्ठी चूक केलीत तुम्ही विनायकराव. ही मदत करायला नको होती तुम्ही. त्या सुरेशकाकांनी मदत करा म्हणून आग्रह केला असेल तुम्हाला. खरे बोलतोय ना मी?” माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत ते म्हणाले.

“”हो, पण तुम्हाला कसं ठाऊक?” मी डोळे मोठे करीत विचारलं.
“”पंधरवड्यापूर्वी हाच प्रस्ताव घेऊन सुरेशकाका माझ्याकडे आले होते. भावनिक गळ घालत होते. हरीभाऊंच्या मुलींची तीन वर्षांची फी थकली आहे, एक सामाजिक कर्तव्य म्हणून तरी नाही म्हणू नका. असं सांगत गयावया करीत होते. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 63 हजारांची रोख रकमेची मदत मी केली त्यांना विनायकराव.” योगेशजी घडाघडा सांगत होते.

एव्हाना आमचं बोलणं ऐकून नीमाही समोर येऊन उभी राहिली होती. मी मात्र खुळ्यासारखा निःशब्द झालो होतो. नजरेसमोर सुरेशकाका, हरीभाऊ आणि हरीभाऊंचे संपूर्ण कुटुंब फेर धरून नाचायला लागले.

तासाभरापूर्वी मी शाळेत वाचलेल्या सुविचाराची अक्षरे डोळ्यांपुढे तरळली. “अनुभव हा एक विचित्र शिक्षक आहे. तो आधी परीक्षा घेतो आणि नंतर धडा शिकवितो.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.