पुणे – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्वीट कॉर्नला राज्यातील पर्यटन स्थळांसह हैदराबाद आणि गुजरात येथून मागणी वाढली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात चार दिवसांत स्वीट कॉर्नच्या भावात किलोमागे 3 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.
गुरूवारी (दि. 1) घाऊक बाजारात स्वीट कॉर्नला किलोला 12 ते 15 रुपये भाव मिळत होता. मात्र, मागणीमुळे रविवारी (दि.4) 15 ते 18 रुपये भाव मिळाला. भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर, बाजारात सध्या दररोज 50 ते 60 टन आवक होत आहे. रविवारीही इतकीच झाली. ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी या वेळेला 100 ते 125 टन आवक होत होती. मात्र, यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटल्याने आवक कमी आहे. सध्या जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागातून तसेच सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागांतून आवक होत आहे.