‘आता आम्ही शहरातली डुकरंही पकडायची का?’

पोलिसांचा सवाल : डुक्‍करमुक्‍त पुण्यासाठी मिळेना बंदोबस्त

पुणे – डिसेंबर 2019 अखेर शहर डुक्करमुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनास दिले आहेत. पण गेल्या महिनाभरापासून या मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्तच मिळत नसल्याचे समोर आले आहे. “आता आम्ही डुकरे पकडण्यासाठी पण काम करायचे का’? असा प्रतिसवाल पोलीस अधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केला जात आहे.

शहरात डुकरांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी मुख्यसभेत वारंवार करण्यात येत असल्याने महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी सप्टेंबर 2018 मध्ये एका महिन्याच्या आत डुक्करमुक्‍त करण्याची घोषणा केली. मात्र, ही मोहीम महापालिकेने अचानक कोणतेही करण न देता थांबविली. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी महापालिकेने जाहीर निवेदन देत “शहरातील डुकरे त्यांच्या मालकांनी शहराबाहेर घेऊन जावीत, अन्यथा ती महापालिकेच्या मालकीची होतील, असे निवेदन प्रसिद्धीस दिले होते. त्यानंतर आता पालिकेने शहरातील डुकरे पकडण्याचे काम कर्नाटकमधील ठेकेदारास दिले आहे.

मात्र, ही मोहीम सुरू केल्यानंतर डुक्कर मालकांकडून उपद्रव केल्या जाण्याच्या भीतीने पालिकेने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. मात्र, पोलिसांकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या बंदोबस्तासाठी 2 वेळा पोलिसांशी बैठक झाली असून त्यांच्याकडून डुक्कर मोहिमेचे वेळपत्रक मागण्यात आले आहे. त्यानुसार, पोलीस बंदोबस्त देता येणे शक्‍य आहे का, हे कळविणार आहेत. तर पोलिसांनी बंदोबस्त दिल्यानंतरच ही मोहीम सुरू केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.