नवी दिल्ली – संसदेच्या विशेष अधिवेशनातील (Special Session of Parliament) पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक (Union Cabinet meeting) घेतली. त्या बैठकीतील चर्चेचा किंवा निर्णयांचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला. त्यामुळे अधिवेशनात काय घडणार याविषयी निर्माण झालेला सस्पेन्स मंत्रिमंडळ बैठक घेत मोदींनी आणखीच वाढवल्याचे मानले जात आहे.
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारपासून झाला. मोदी सरकारने आधी जाहीर केल्यानुसार अधिवेशनात पहिल्या दिवशी संसदेच्या 75 वर्षांच्या वाटचालीवर चर्चा झाली. अर्थात, अधिवेशनात बरेच काही घडू शकते, असा अंदाज विरोधक आधीपासूनच वर्तवत आहेत. त्यामुळे सरकारने अद्यापही सगळे पत्ते खोलले नसल्याची जोरदार चर्चा झडत आहे.
अशात अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय होतील, असे सूतोवाच खुद्द मोदींनी अधिवेशन सुरू होण्याआधी केले. त्यांनी पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक घेतली. साहजिकच, त्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले. मात्र, बैठकीनंतर सरकारने नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद आयोजित केली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीविषयीची माहिती पुढे आली नाही. त्यातून अधिवेशनात काय घडणार ही उत्सुकता आणखीच ताणली गेली आहे.
महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार हालचाली करणार की एकत्रित निवडणुकांच्या दिशेने पाऊले उचलणार यांसारखे तर्क लढवण्यास त्यामुळे अजूनही वाव मिळणार आहे. त्याशिवाय, देशाच्या नावाबाबत काही घडणार का हे कुतूहलही तूर्त कायम राहणार आहे.